रशिया-युक्रेन युद्धाचा भडका उडू शकतो

- रशियन राजदूतांचा इशारा

मॉस्को/किव्हयुद्धाचा भडका – रशिया व युक्रेनच्या सीमेवर कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो, असा इशारा ब्रिटनमधील रशियन राजदूतांनी दिला आहे. नाटो रशियन सीमेनजिक मोठ्या प्रमाणात हालचाली करीत असून त्यातून उडणारी ठिणगी युद्धास कारणीभूत ठरेल, असे रशियन राजदूत आंद्रेई केलिन यांनी बजावले. अमेरिकेतील रशियन राजदूत ऍनातोली अँटानोव्ह यांनीही, युक्रेन मुद्यावरून संघर्ष उडाल्यास रशिया माघार घेणार नसल्याचे म्हटले आहे. रशियन अभ्यासगट ‘वाल्दाई क्लब’नेही युक्रेनवरील हल्ल्याची शक्यता वर्तविली आहे. ब्रिटनचे संसद सदस्य ऍलन वेस्ट यांनी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युक्रेनच्या मुद्यावरून अणुयुद्ध छेडू शकतात, असा दावा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच नाटोसह अमेरिका व ब्रिटन या दोन्ही देशांनी युक्रेन मुद्यावरून रशियाला इशारा दिला होता. रशियाकडून युक्रेन सीमेवर सुरू असलेल्या हालचालींसंदर्भात आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत, असे अमेरिकेने बजावले होते. तर ब्रिटनने, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची चूक केली तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, याची जाणीव करून दिली होती. नाटोनेही रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, याकडे लक्ष वेधले होते. या पार्श्‍वभूमीवर आता थेट रशियाने युद्धाचा भडका उडण्याबाबत वक्तव्य करून खळबळ उडविली आहे.

युद्धाचा भडका‘रशिया-युक्रेन सीमेवर युद्धाचा भडका उडण्याचा धोका आहे. हा धोका अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. रशियाच्या सीमेनजिक नाटोची तैनाती वाढते आहे. बाल्टिक सागरी क्षेत्रातील लष्करी हालचालींनाही वेग आल्याचे दिसते. अण्वस्त्रसज्ज विमाने रशियन सीमेपासून अवघ्या २० किलोमीटरवरून भरार्‍या मारत आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर एखादी ठिणगी उडून त्याचे रुपांतर संघर्षात होण्याची शक्यता आहे’, असा इशारा ब्रिटनमधील रशियन राजदूत आंद्रेई केलिन यांनी दिला. यावेळी केलिन यांनी ब्रिटनसह इतर नाटो देश रशियन सीमेच्या अधिकाधिक जवळ येत असल्याकडेही लक्ष वेधले.

रशियातील अभ्यासगट ‘वाल्दाई क्लब’नेही रशिया-युक्रेन संघर्षाची शक्यता वाढल्याचे म्हटले आहे. ‘वॉर बिटविन रशिया ऍण्ड युक्रेन: बेसिक सिनॅरिओ’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या लेखात रशियाकडून करण्यात येणार्‍या हल्ल्याचा दावा केला आहे. यात रशियाला सध्या युक्रेनबरोबरची ‘जैसे थे’ स्थिती नको आहे, असे म्हटले आहे. युक्रेनकडून मिन्स्क कराराचे उल्लंघन होत असून आक्रमक रशियाविरोधी धोरण राबविण्यात येत असल्याने रशियन वर्तुळात नाराजी आहे. त्याचवेळी युद्धाचा भडकायुक्रेन नाटोच्या सदस्यत्त्वासाठी जोरदार प्रयत्न करीत असून पाश्‍चात्यांकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण सहकार्य घेत आहे. यामुळे युक्रेनमध्ये पाश्‍चात्यांचा तळ निर्माण होण्याची भीती आहे. ही बाब टाळण्यासाठी रशिया युक्रेनवर निर्णायक आक्रमण करेल, असे रशियन अभ्यासगटाने म्हटले आहे.

दरम्यान, ब्रिटनचे संसद सदस्य ऍलन वेस्ट यांनीही रशिया-युक्रेन संघर्षाची शक्यता वर्तविली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या स्वभावाचा उल्लेख करून पारंपारिक युद्ध हरण्याची भीती असल्यास ते अणुयुद्धाचाही वापर करु शकतात, असे वेस्ट यांनी बजावले. युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी देखील रशियाने सीमेनजिक एक लाखांहून अधिक सैन्य जमविल्याचा दावा केला असून पाश्‍चात्य देशांची पापणी लवायच्या आत रशिया हल्ला चढवू शकतो, असा इशारा दिला आहे.

leave a reply