सीमावर्ती भागात जनसंख्येतील असमतोलामुळे केंद्र सरकारने बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढविले

- बीएसएफचे महासंचालक पंकज कुमार सिंग

सीमावर्तीनवी दिल्ली – देशाच्या सीमावर्ती राज्यांमधील ‘बीएसएफ’चे (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) कार्यक्षेत्र ५० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला काहीजणांकडून विरोध होत होत आहे. मात्र आसाम, पश्‍चिम बंगाल यासारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये होत असलेले जनसंख्येतील बदल लक्षात घेऊन केंद्र सरकारने बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला असावा, असे बीएसएफचे महासंचालक पंकज कुमार सिंग यांनी म्हटले आहे. मात्र बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढले तरी या राज्यांमध्ये समांतर पोलीस दल चालविण्याची बीएसएफची इच्छा नाही, असे सांगून बीएसएफ या राज्यांमधील पोलीस दलाला सहकार्य करणार असल्याचे पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केले.

बीएसएफच्या ५७ व्या स्थापनादिनी महासंचलाक पंकज कुमार सिंग बोलत होते. पश्‍चिमेकडील पाकिस्तान व पूर्वेकडील बांगलादेशला भीडलेल्या भारताच्या सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी बीएसएफवर आहे. सुमारे ६३०० किलोमीटर इतक्या सीमेवर बीएसएफचे जवान तैनात आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे १५ किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत बीएसएफचे कार्यक्षेत्र मर्यादित ठेवण्यात आले होते. मात्र ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने बीएसएफचे कार्यक्षेत्र तब्बल ५० किलोमीटरपर्यंत विस्तारले. आंतरराष्ट्रीय सीमेपासून ते सुमारे ५० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात बीएसएफ आता शोधमोहीम, जप्ती आणि अटक करू शकते.

या निर्णयाला काही राज्यांनी विरोध केला आहे. यामुळे राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याची टीका देखील सुरू झाली होती. पण बीएसएफला राज्यांच्या पोलीस दलांच्या कारभारात हस्तक्षेप करण्यात व समांतर पोलीस दल चालविण्यात स्वारस्य नाही, अशी ग्वाही बीएसएफचे महासंचालक पंकज कुमार सिंग यांनी दिली. बीएसएफच्या या विस्तारित क्षेत्रातही आरोपपत्र व चौकशीचे अधिकार राज्यांच्या पोलीस दलांकडेच आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गेल्या काही वर्षांपासून आसाम व पश्‍चिम बंगाल या राज्यांच्या सीमेला भीडलेल्या भागात जनसंख्येत असमतोल निर्माण झालेला आहे. याची अनेक कारणे असू शकतील, पण हे बदल झाले आहेत, हे नाकारता येऊ शकत नाही, असे सांगून याचे परिणाम देखील पंकज कुमार सिंग यांनी लक्षात आणून दिले.

सीमेजवळील जिल्ह्यांमधील जनसंख्यिकी बदलांमुळे मतदानाचे स्वरुप बदलत गेले. याला घुसखोरी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे व याविरोधात असंतोष वाढत चालला आहे. काहीवेळेस या असंतोषाचा उद्रेक झालेला आहे. म्हणूनच ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढविले असावे, असे महासंचालक पंकज कुमार सिंग म्हणाले. ही कार्यक्षेत्र विस्तारण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविली जाईल. बीएसएफ लवकरच यासाठी नव्या चौक्या उभारणार असल्याची माहिती पंकज कुमार सिंग यांनी दिली. शिवाय या विस्तारामुळे बीएसएफच्या जवानांना एका चौकीमधून दुसर्‍या चौकीपर्यंत जाणे अधिक सोपे जाईल, असे सांगून महासंचालकांनी त्यावर समाधान व्यक्त केले आहे.

leave a reply