रशिया-युक्रेन युद्धाची अखेर राजनैतिक मार्गाने व्हायला हवी

- अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन

रशिया-युक्रेन युद्धाची अखेरवॉशिंग्टन – ‘रशियाविरोधातील युद्धात अमेरिका युक्रेनला जास्तीत जास्त सहाय्य पुरवेल. युद्धभूमीबरोबरच वाटाघाटींसाठीदेखील अमेरिका सहाय्य करील. रशिया-युक्रेन युद्धाची अखेर राजनैतिक तोडग्याने व्हायला हवी, असे आम्हाला वाटते’, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी केले आहे. यापूर्वी अमेरिकेतील ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर, नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेनने राजनैतिक वाटाघाटींसाठी तयार रहायला हवे, असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता युक्रेनला अब्जावधी डॉलर्सचा शस्त्रपुरवठा करणाऱ्या बायडेन प्रशासनानेही वाटाघाटींचा मुद्दा पुढे आणल्याचे दिसत आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला 110 हून अधिक दिवस उलटले असून गेल्या काही दिवसात रशियाला मोठे सामरिक यश मिळाले आहे. रशियाला मिळालेल्या आघाडीमुळे युक्रेनसह पाश्चिमात्य देश अस्वस्थ झाले आहेत. युक्रेनचे नेतृत्त्व रशियाला मागे लोटण्यासाठी अधिकाधिक शस्त्रांची मागणी करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला युरोपिय देश तसेच अमेरिकेने रशियाबरोबर वाटाघाटींची तयारी सुरू केली आहे. पाश्चिमात्य नेते व विश्लेषकांकडून एकापाठोपाठ येणारी वक्तव्ये त्याला दुजोरा देणारी ठरतात.

दरम्यान, यापूर्वी 2014 साली डोन्बासमधील संघर्ष थांबविण्यासाठी पुढे आणलेला ‘मिन्स्क शांतीकरार’ युक्रेनला पुन्हा शस्त्रसज्ज करण्याच्या योजनेचा भाग होता, असा दावा माजी राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी केला. ‘डोन्बास क्षेत्रातील पराभवातून सावरता यावे यासाठी आपण मिन्स्क कराराची तयारी दर्शविली होती. पुढील काही वर्षात आर्थिक स्थैर्य मिळवून संरक्षणसज्ज होता यावे हा त्यामागील उद्देश होता’, असे पोरोशेन्को यांनी पाश्चात्य माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

रशिया-युक्रेनमध्ये वाटाघाटी व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असतानाच युक्रेनने रशियन नौदलावर हल्ले सुरू केल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी युक्रेनी नौदलाने अमेरिकेच्या हार्पून क्षेपणास्त्रांचा वापर करून ब्लॅक सीमधील रशियन नौदलाची टगबोट उडविल्याचा दावा केला.

leave a reply