नव्या निर्बंधांमुळे अमेरिकेवर विश्वास ठेवता येणार नसल्याचे सिद्ध झाले

- इराणच्या राष्ट्राध्यक्षांची टीका

अमेरिकेवर विश्वासतेहरान – ‘एका हाताने अमेरिका इराणला अणुकराराबाबत वाटाघाटी करायला तयार असल्याचे संदेश पाठवित आहे. तर दुसऱ्या हाताने तीच अमेरिका इराणवर निर्बंध टाकत आहे. अशाप्रकारे आश्वासने तोडणाऱ्या अमेरिकेवर अविश्वास ठेवण्याचा अधिकार जगाने इराणला दिला पाहिजे. तसेच अमेरिकेवर यापुढे विश्वास ठेवता येणार नाही’, अशी जळजळीत टीका इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केली. अमेरिकेच्या कोषागार विभागाने इराणचा अणुकार्यक्रम व रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी संबंधितांवर निर्बंध लादले होते. यावर इराणकडून ही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या कोषागार विभागाने इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित 10 जणांवर निर्बंध लादले होते. यामध्ये कुद्स फोर्सेसच्या अधिकाऱ्यांसह रशिया व चीनमधील इराणवंशियांचा देखील समावेश होता. तर काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या कोषागार विभागाने इराणच्या पेट्रोकेमिकल उद्योगाशी संबंधितांवर निर्बंधांची कारवाई केली. यामुळे खवळलेल्या इराणने अमेरिकेच्या बायडेन प्रशासनावर टीकेची झोड उठविली आहे.

अमेरिकेवर विश्वासव्हिएन्ना येथे सुरू असलेल्या अणुकार्यक्रमाबाबतच्या वाटाघाटींसाठी इराणचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याआधी अमेरिकेने निर्बंध लादण्याचा खुळचटपणा सोडून द्यावा, असे ताशेरे इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिरअब्दोल्लाहियान यांनी ओढले. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी देखील अमेरिकेवर टीकास्त्र सोडले. ‘इराणची प्रगती रोखण्यासाठी अमेरिका निर्बंधांची चाल खेळत आहे. पण या निर्बंधांतून बाहेर पडून इराणने आत्तापर्यंत आपली प्रगती केली आहे’, असा टोला राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी लगावला.

‘त्यामुळे स्वत:च्याच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अमेरिकेवर अविश्वास दाखविण्याचा अधिकार जगाने इराणला द्यायला हवा’, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केली. अणुकराराच्या वाटाघाटींसाठी आमंत्रित करुन निर्बंध लादणाऱ्या अमेरिकेवर विश्वास ठेवता येणार नाही, याबाबत इराणची आधीची भूमिकाच योग्य होती, असा दावा इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी याआधीच अमेरिका विश्वास ठेवण्याजोगी नसल्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन पुढच्या महिन्यात इस्रायल व सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन इस्रायलची सुरक्षा आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर चर्चा करणार असल्याचे अमेरिकी माध्यमांचे म्हणणे आहे. बायडेन यांच्या या दौऱ्याआधी इराणने अणुकराराबाबत आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे दिसत आहे.

leave a reply