एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक नेटवर्क’विरोधात रशियाकडून प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिमचा वापर

अमेरिकी दैनिकाचा दावा

starlinkवॉशिंग्टन/मॉस्को – अमेरिकी उद्योजक एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक नेटवर्क’चा युक्रेनी लष्कराकडून होणारा वापर रोखण्यासाठी रशियाने प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिमचा वापर केल्याचा दावा अमेरिकी दैनिकाने केला. रशियाकडून डोन्बास तसेच खेर्सनमधील स्टारलिंकच्या सेवा खिळखिळ्या करण्यासाठी ‘टोबोल इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम’चा वापर करण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. ही यंत्रणा रशियाने आपले उपग्रह सुरक्षित ठेवण्यासाठी विकसित केली होती.

अमेरिकेच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. रशियाकडून सात ठिकाणी ‘टोबोल इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम’ तैनात करण्यात आली आहे. त्यात राजधानी मॉस्कोसह युरोपातील संरक्षणतळ असलेल्या कॅलिनिनग्रॅडचा समावेश आहे. या तळांवर असलेल्या यंत्रणांकडून युक्रेनमधील स्टारलिंक उपग्रहांचे नेटवर्क खिळखिळे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने सदर माहिती देण्यात येत असल्याचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने सांगितले आहे.

advanced electronic warfare systemगेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. या लष्करी मोहिमेदरम्यान रशियन संरक्षणदलांनी युक्रेनमधील सॅटेलाईट कम्युनिकेशन व इंटरनेट पुरविणारी यंत्रणा उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे युक्रेनी लष्कराकडे स्वतंत्र सॅटेलाईट संपर्कयंत्रणा उपलब्ध नाही. अमेरिकेच्या संरक्षणविभागाने मस्क यांना निर्देश देऊन त्यांच्या ‘स्टारलिंक नेटवर्क’ची सेवा युक्रेनी लष्कराला पुरविण्यास सांगितले होते. त्यासाठी मस्क यांनी आतापर्यंत कोट्यावधी डॉलर्सचा खर्च केला आहे.

सध्या ही सेवा सुरू असली तरी त्यावर रशियाकडून मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. कंपनीकडून सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी वाढत्या रशियन हल्ल्यांमुळे लवकरच युक्रेनमधील ‘स्टारलिंक नेटवर्क’ नष्ट होईल, असे कंपनीशी निगडित सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. स्टारलिंक नेटवर्क बंद पडल्यास युक्रेनच्या संरक्षणदलांच्या क्षमतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात खेर्सनमध्ये तसेच बाखमत भागातही युक्रेनी लष्कराच्या संपर्कयंत्रणेवर परिणाम झाल्याचे दावे समोर आले होते.

मस्क यांच्या ‘स्पेसेक्स’ कंपनीने जवळपास तीन हजार छोटे उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत. पृथ्वीच्या कक्षेत (लो ऑर्बिट) भ्रमण करणाऱ्या या उपग्रहांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात जलद इंटरनेट सेवा पुरविण्याची क्षमता आहे. ‘स्टारलिंक’ अंतर्गत पृथ्वीच्या कक्षेत जवळपास ४० हजार छोटे उपग्रह सोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना मस्क यांनी आखली आहे. यासाठी मुदत निश्चित नसली तरी त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे मस्क यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

leave a reply