सैबैरियात भडकलेले वणवे विझविण्यासाठी रशियाकडून ‘क्लायमेट इंजिनिअरिंग’ तंत्रज्ञानाचा वापर

मॉस्को – रशियाच्या अतिपूर्वेकडील सैबैरियाचा भाग असलेल्या ‘साखा-याकुतिआ’ प्रांतात तब्बल 216 वणवे भडकले असून या वणव्यांमुळे 15 लाख हेक्टर्सहून अधिक परिसर प्रभावित झाल्याचे सांगण्यात येते. वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन हजारांहून अधिक जवानांसह स्वयंसेवक तसेच लष्करी विमानेही तैनात करण्यात आली आहेत. मात्र त्यानंतरही आग नियंत्रणात येत नसल्याने रशियन यंत्रणांनी ‘क्लायमेट इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी’चा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या तंत्रज्ञानाच्या जोरावर पाऊस पाडून आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असा दावा सूत्रांनी केला आहे.

Advertisement

सैबैरियात भडकलेले वणवे विझविण्यासाठी रशियाकडून ‘क्लायमेट इंजिनिअरिंग’ तंत्रज्ञानाचा वापरगेल्या दोन आठवड्यांपासून सैबैरियातील ‘साखा-याकुतिआ’ प्रांतात वणवे भडकण्यास सुरुवात झाली आहे. या वणव्यांमागे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ व त्यामुळे आलेली उष्णतेची लाट ही प्रमुख कारणे असल्याचे रशियन अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे सैबेरियातील तापमान 40 डिग्री सेल्सियसच्या वर गेले आहे. वाढत्या तापमानापाठोपाठ सैबैरियाला ‘ड्राय स्टॉर्म्स’चा फटका बसला असून, यातूनच वणवे पेटल्याची माहिती देण्यात आली आहे.

सैबेरियातील 50हून अधिक शहरांना वणव्याचा फटका बसला असून याकुतिआमधील विमानतळही काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. वणव्यामुळे या भागातील मोठा वीजप्रकल्पही बंद करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियन लष्कराने आपली विमाने तसेच पथके तैनात केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र लष्कराच्या मदतीनंतरही वणव्यांवर नियंत्रण न मिळविता आल्याने ‘क्लायमेट इंजिनिअरिंग’ तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्यात येत असल्याचे मानले जाते.सैबैरियात भडकलेले वणवे विझविण्यासाठी रशियाकडून ‘क्लायमेट इंजिनिअरिंग’ तंत्रज्ञानाचा वापर

‘अँटोनोव्ह एएन-26 ट्रान्सपोर्ट प्लेन’मध्ये यासंदर्भातील यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. त्यात ‘सिल्व्हर आयोडाईड काट्रिजेस’चा समावेश असून हे रसायन ढगांवर फवारण्यात येत आहे. या रसायनांच्या प्रभावामुळे पाऊस पडून आग विझविण्यास सहाय्य होईल, असा दावा रशियाच्या ‘इमर्जन्सी सर्व्हिसेस’ने केला आहे. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीमधील दुबईसह इतर भागांमध्ये ‘ड्रोन्स’च्या सहाय्याने ‘क्लाऊड सिडींग’ करून पाऊस पाडण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

leave a reply