युक्रेनला लष्करी सहाय्य केल्यास रशियाकडून इस्रायलला उत्तर देण्याचा इशारा

अमेरिकी माध्यमांचा दावा

न्यूयॉर्क – युक्रेनच्या युद्धासाठी रशियाला इराणकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत आहे. त्यामुळे युक्रेनला इस्रायलकडून शस्त्रे मिळणे, ही अगदी स्वाभाविक बाब ठरते, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. इस्रायलमध्ये सत्ताबदल होत असताना, झेलेन्स्की यांचे हे विधान माध्यमांनी उचलून धरले. कारण लवकरच इस्रायलच्या पंतप्रधानपदावर येणाऱ्या बेंजामिन नेत्यान्याहू यांचे रशियाशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे युक्रेनला इस्रायलकडून होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबू नये, यासाठी झेलेन्स्की धडपडत असल्याचे दिसते. मात्र याच दरम्यान, इस्रायलकडून युक्रेनला केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावरून रशियाने धमकावल्याच्या बातम्या अमेरिकन माध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत.

putin zelenskyरशियाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या युक्रेनला इस्रायलने थेट किंवा त्रयस्थ देशाच्या माध्यमातून लष्करी सहाय्य पुरविले, तर त्याला योग्य ते उत्तर मिळेल, असा इशारा रशियाने दिला. अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने बायडेन प्रशासनाशी जोडलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा केला. रशिया नेमक्या कोणत्या स्वरुपात इस्रायलला उत्तर देईल, याचा खुलासा अमेरिकी वृत्तवाहिनीने केलेला नाही. पण युक्रेनचे युद्ध भडकल्यापासून इस्रायल आणि रशियामध्ये निर्माण झालेल्या तणावाची माहिती या वृत्तवाहिनीने दिली आहे.

युक्रेनवर हल्ले चढविण्यासाठी इराणने रशियाला ड्रोन्स पुरविल्याचा आरोप करून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी इस्रायलकडून लष्करी सहाय्याची मागणी केली होती. रशियाची क्षेपणास्त्रे भेदण्यासाठी इस्रायलने ‘आयर्न डोम’ ही प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवावी, असा तगादा युक्रेनने लावला होता. इस्रायलने सदर मागणी फेटाळली होती, पण युक्रेनला छोट्या स्वरुपात लष्करी सहाय्य केल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे संतापलेल्या रशियाच्या नेत्यांनी इस्रायलवर जोरदार ताशेरे ओढले होते.

netanyahuरशियाविरोधी संघर्षात नाझीवाद्यांचे सहाय्य घेणाऱ्या युक्रेनला इस्रायलने कुठल्याही स्वरुपाचे सहाय्य करू नये, असे आवाहन रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी केले होते. तर रशियाच्या विरोधानंतरही इस्रायलने युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविल्याचे उघड झाल्यास, रशिया व इस्रायलमधील संबंध संपुष्टात येतील, असा इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला होता. यानंतर इस्रायलच्या सरकारने युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविली नसल्याचे जाहीर केले होते.

पण बेंजामिन नेत्यान्याहू यांनी एका मुलाखतीदरम्यान, पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान झालोच तर युक्रेनला शस्त्रसज्ज करण्याबाबत विचार करू, असे म्हटले होते. तसेच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवरील हल्ल्यांबाबत फेरविचार करावा, असे नेत्यान्याहू यांनी सुचविले होते. पण त्यांनी ही विधाने आपल्या परराष्ट्र धोरणात समतोल असेल, हे दाखविण्यासाठी केली असावी, अशी शक्यता समोर येत आहे.

दोन दिवसांपूर्वी इस्रायलमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत नेत्यान्याहू यांचा विजय झाल्यानंतर युक्रेनने इस्रायलकडे नव्याने लष्करी सहाय्याची मागणी सुरू केली. याला काही तास उलटत नाही तोच, रशियाने युक्रेनला शस्त्रसज्ज करण्याबाबत इस्रायलला इशारा दिल्याचा दावा अमेरिकी वृत्तवाहिनी करीत आहे.

दरम्यान, अमेरिकन वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या या बातमीवर रशियाने प्रतिक्रिया दिलेली नाही. तर नेत्यान्याहू देखील अधिकृतस्तरावर रशिया-युक्रेन युद्धाबाबत आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती दिली जाते.

leave a reply