हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज रशियन लढाऊ विमाने सिरियात दाखल

दमास्कस, दि. १६ (वृत्तसंस्था) – हायपरसोनिक किंझल क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली रशियाची ‘मिग-३१के’ लढाऊ विमाने व ‘टीयू-२२एम३’ बॉम्बर्स विमाने सिरियाच्या खेमिम हवाईतळावर दाखल झाली. भूमध्य समुद्रात आयोजित केलेल्या नौदला सरावाचा भाग म्हणून ही तैनाती असल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तर युक्रेनच्या पूर्वेकडील सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील रशिया सिरियामधील आपल्या तैनातीकडे दुर्लक्ष करण्यास तयार नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

सिरियाच्या खेमिम हवाईतळावर रशियाचे हवाईदलाची तुकडी तैनात आहे. उभय देशांमधील संरक्षण सहकार्याअंतर्गत रशियाने ही तैनाती केली आहे. रशियाकडून सिरियाच्या पश्‍चिमेकडील हवाईहद्दीत हवाई सरावांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यंदाही रशियाने पूर्व भूमध्य समुद्रात नौदल सराव आयोजित केला आहे.

गेल्या महिन्यात, २० जानेवारी रोजी रशियन संरक्षण मंत्रालयाने अटलांटिक ते पॅसिफिक क्षेत्रात वेगवेगळ्या सरावांची घोषणा केली होती. यापैकी भूमध्य समुद्राच्या क्षेत्रात रशियन नौदलाच्या पॅसिफिक, ब्लॅक सी आणि नॉर्दन फ्लिट्समधील १५ विनाशिका आणि ३० लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. यासाठी रशियाच्या लढाऊ व बॉम्बर्स विमानांचा ताफा मंगळवारी खेमिम हवाईतळावर दाखल झाला.

यामध्ये मिग-३१के लढाऊ आणि टीयू-२२एम३ या बॉम्बर विमानांचा समावेश आहे. दोन्ही श्रेणीतील ही विमाने किंझल या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असल्याची माहिती रशियन वृत्तवाहिनीने दिली. आवाजाच्या १० पट वेगाने प्रवास करणारी किंझल क्षेपणास्त्रे दोन हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतात, असे रशियन लष्कराचे म्हणणे आहे. या क्षेपणास्त्राच्या वेगामुळे रडारवर त्याचा माग काढणे देखील अवघड होत असल्याची माहिती रशियन लष्कराने दिली.

हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या लढाऊ व बॉम्बर विमानांच्या या तैनातीची बातमी समोर येत असतानाच, रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू हे देखील सिरियात दाखल झाले. त्यांनी सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांची भेट घेतली व त्यानंतर खेमिम हवाईतळाला भेट दिली. या ठिकाणी संरक्षणमंत्री शोईगू यांनी रशियन अधिकार्‍यांशी चर्चा केली.

leave a reply