रशियन इंधनकपातीमुळे युरोपवर मंदीचे संकट ओढावेल

-अर्थतज्ज्ञांचा दावा

recessionमॉस्को/ब्रुसेल्स – रशियाकडून युरोपचा इंधनपुरवठा रोखण्याचे संकेत मिळत असून ही बाब युरोपातील इंधनाच्या दरांचा भडका उडविण्यास कारणीभूत ठरेल. त्यामुळे युरोपला असणारा मंदीचा धोका अधिक वाढू शकतो, असा दावा जपानच्या ‘नोमुरा’ बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी दिला. इंधनदरांमधील भडक्याव्यतिरिक्त अमेरिकेतून घटलेली मागणी व वाढती महागाई हे घटकदेखील युरोपच्या मंदीत भर टाकणारे ठरतील, असे नोमुराच्या अर्थतज्ज्ञांनी बजावले. गेल्याच आठवड्यात युरोपचा भाग असणाऱ्या ‘युरोझोन’मध्ये महागाई निर्देशांकाने 8.6 टक्क्यांचा उच्चांक नोंदविल्याचे समोर आले होते.

recessionary-crisisगेल्या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत कोरोनाची लाट ओसरत असताना युरोपातील इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली होती. इंधनाची अचानक वाढलेली मागणी व पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे घटलेला पुरवठा यामुळे ही दरवाढ झाली होती. त्याचा प्रभाव ओसरत असतानाच रशिया-युक्रेन युद्धाचा भडका उडाला. त्यामुळे युरोपमध्ये इंधनाच्या दरांमध्ये होणारी वाढ कायम राहिली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही युरोपिय देशांनी रशियाकडून घेण्यात येणाऱ्या इंधनावर बंदी टाकली, तर काही देशांचा इंधनवायुचा पुरवठा रशियाने बंद केला.

recessionary-crisis-fuelमात्र हे सुरू असताना रशियन इंधनाला सक्षम पर्याय उभे करण्याचे युरोपचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. अमेरिका, आखात तसेच आफ्रिकी देशांनी इंधनपुरवठा वाढविला असला तरी त्याचे प्रमाण रशियन इंधनाच्या तुलनेत नगण्य आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कितीही आरडाओरड केली तरी युरोपसमोर सध्या तरी रशियन इंधनाव्यतिरिक्त पर्याय नाही. याच पार्श्वभूमीवर आता रशियानेही युरोपच्या इंधनपुरवठ्यात घट केली असून ते रोखण्याचेही इशारे दिले आहेत. त्यामुळे पुढील काळात युरोपिय देशांना इंधनदरांमधील वाढीबरोबरच इंधनटंचाईचाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे ‘नोमुरा’ने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. ‘2022 सालच्या दुसऱ्या सहामाहीत युरोपमध्ये मंदीला सुरुवात होईल. ही मंदी 2023सालच्या उन्हाळ्यापर्यंत कायम राहिल’, असे नोमुरातील अर्थतज्ज्ञ जॉर्ज बकले यांनी बजावले. युरोपव्यतिरिक्त अमेरिका, कॅनडा, ब्रिटन यासारख्या आघाडीच्या देशांनाही आर्थिक मंदीचा फटका बसेल, याकडे ‘नोमुरा’च्या अहवालात लक्ष वेधण्यात आले.

leave a reply