रशियाला आर्क्टिकमध्ये इंधनाचा मोठा साठा सापडला

मॉस्को – युक्रेनच्या युद्धामुळे युरोपिय देशांवर इंधनाचे संकट कोसळले आहे. इंधनाचे दर कडाडले असून जर्मनीसारख्या देशात येत्या काही महिन्यात इंधनाची चणचण जाणवू शकते, असे इशारे दिले जात आहेत. अशा परिस्थितीत, रशियाला आर्क्टिक सागरी क्षेत्रात इंधनाचा मोठा साठा सापडला आहे. जवळपास आठ कोटी टनहून अधिक इंधन या क्षेत्रात असल्याचा दावा रशियन कंपनी करीत आहे.

oil-productionरशियाच्या ‘रोझनेफ्ट’ या आघाडीच्या इंधन कंपनीने काही दिवसांपूर्वी यासंबंधीची घोषणा केली. आर्क्टिकच्या ‘मेदीन्स्को-वरांदिस्की’ या भागात उत्खनन सुरू असताना इंधनाचा हा साठा सापडला. रशियन कंपनीने केलेल्या तपासणीनंतर प्रतिदिन 220 क्युबिक मीटर या वेगाने इंधनाचा उपसा या क्षेत्रातून होऊ शकतो, असा दावा रशियन कंपनीने केला. येथील इंधन हलक्या प्रतीचे तसेच सल्फर आणि चिकटपणा फारच कमी असल्याचे रोझनेफ्टने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पेशोरा समुद्राच्या क्षेत्रात हा इंधनसाठा सापडला आहे. यामुळे ‘तिमान-पेशोरा प्रांतात इंधनाचा मोठा साठा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. याआधीही या भागात इंधनाचे साठे सापडले होते. रशियातील आघाडीच्या कंपन्या आधीच येथील इंधनाच्या उत्खननात गुंतलेल्या आहेत. एकट्या रोझनेफ्ट या कंपनीकडे आर्क्टिकमधील 28 ठिकाणी इंधनाच्या उत्खननाचे परवाने आहेत. यापैकी आठ पेशोराच्या समुद्रातील आहेत.

rosneft.pechoraseaआर्क्टिकमध्ये इंधन, इंधनवायू तसेच इतर नैसर्गिक खनिजसंपत्तीचा मोठा साठा असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे रशियाबरोबरच अमेरिका, कॅनडा, नॉर्वे, डेन्मार्क हे देश या क्षेत्रावर आपला अधिकार सांगत आहेत. अमेरिका व कॅनडाच्या विनाशिका तसेच जहाजे आर्क्टिकच्या क्षेत्रात तैनात आहेत. तर काही महिन्यांपूर्वी कॅनडाने या सागरी क्षेत्रात इंधन उत्खननासाठी प्रयत्न केल्याचे आरोप झाले होते. तर अमेरिकेच्या साथीने नाटो देखील या भागात लष्करी हालचाली करीत असल्याचा ठपका रशियाने ठेवला होता.

गेल्या तीन महिन्यांपासून युक्रेनमध्ये युद्ध भडकले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कडाडले आहेत. रशियाने इंधनाची कोंडी केल्यामुळे युरोपिय देशांवर इंधनसंकट कोसळल्याचा ठपका अमेरिका व युरोप करीतआहे. रशियाविरोधी संघर्षाची तयारी म्हणून नाटोने युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये आपली सैन्यतैनाती सुरू केली होती. तर काही दिवसांपूर्वी स्वीडन व फिनलंड या देशांना नाटोत सहभागी करून घेतले होते. नाटोच्या या हालचाली रशियाच्या आर्क्टिक क्षेत्रातील हितसंबंधांनाआव्हान देणाऱ्या ठरू शकतात. येत्या काळात युक्रेनच्या युद्धाची धग आर्क्टिकपर्यंत पोहोचू शकते, असा इशारा रशियाने दिला होता.

leave a reply