भारतासाठी रशियन इंधनाचे महत्त्व अमेरिकेला पटवून दिले

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

अमेरिकेला पटवून दिलेबँकॉक – भारत रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहे, ही बाब अमेरिकेला आवडणारी नाही. पण भारत या निर्णयाबाबत बचावात्मक पवित्रा घ्यायला तयार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कडाडलेले असताना, आपल्या जनतेला माफक दरात इंधन उपलब्ध करून देणे हे भारताचे नैतिक कर्तव्य ठरते. त्यासाठी आवश्यक असलेले निर्णय घेणे भाग आहे, हे भारताने अमेरिकेला पटवून दिलेले आहे आणि ही बाब अमेरिकेने स्वीकारली आहे, असा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला.

भारत व थायलंडमधील 9 व्या ‘जॉईंट कमिशन’च्या बैठकीसाठी परराष्ट्रमंत्री जयशंकर थायलंडमध्ये आले आहेत. थायलंडमधील भारतीय समुदायासमोर बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना भारत रशियाकडून खरेदी करीत असलेल्या इंधनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना त्यांनी देशाची भूमिका पुन्हा एकदा परखडपणे मांडली. इंधनाचे दर कडाडलेले असताना, दोन हजार डॉलर्स इतके दरडोई उत्पन्न असलेल्या भारतीय जनतेला हे दर परवडणारे नाहीत. अशा परिस्थितीत आपल्या जनतेसाठी माफक दरात इंधन उपलब्ध करून देण्यासाठी भारताला काही निर्णय घेणे भाग आहे. रशियाकडून भारताने इंधनाची खरेदी केली, याने अमेरिका जरूर नाराज झाली असेल. पण भारत आपल्या या निर्णयावर बचावात्मक पवित्रा स्वीकारायला तयार नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले.

जनतेसाठी हा निर्णय घेणे भाग असल्याचे भारताने अमेरिकेसमोर स्पष्टपणे मांडले. हुशारी दाखविण्यापेक्षा स्पष्टपणे आपली भूमिका मांडली व त्यामागे असलेल्या देशाच्या हितसंबंधांची जाणीव करून दिली, तर काहीवेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमचे म्हणणे ऐकले जाते, असे सांगून जयशंकर यांनी अमेरिकेने भारताची भूमिका मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला.

दरम्यान, सॉफ्ट पॉवर अर्थात देशाच्या सांस्कृतिक, कला-क्रीडा आणि संगीत इत्यादींच्या बळावर जगावर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या शक्तीचा वापर करणे हे सरकारवर अवलंबून नसते. तर त्यासाठी त्या देशाचा समाजच पुढाकार घेऊन हे काम करू शकतो. त्याला सहकार्य करण्याचे काम सरकारकडून केले जाऊ शकते, असे जयशंकर यावेळी म्हणाले.

देशाची सॉफ्ट पॉवर अधिक वाढविण्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच कोरोनाची साथ आलेली असताना आयुर्वेद व भारताची इतर पारंपरिक उपाचरपद्धती यांचा सरकारने पुरस्कार केला. यामुळे गुजरातच्या जामनगरमध्ये भारताच्या पारंपरिक उपचार पद्धतींचे ‘ग्लोबल सेंटर’ उभे राहिले आहे, याकडे परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले.

याच्याबरोबरीने आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्नधान्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, भारताने बाजरी तसेच इतर धान्याचा पर्याय सुचविण्याचे काम हाती घेतले आहे. हा देखील सॉफ्ट पॉवर वाढविण्याचा भाग असू शकतो. यामुळे आपण इतरांच्या आहारशैलीत बदल घडवून आणू शकतो, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले.

leave a reply