रशियन राष्ट्राध्यक्ष इराणमध्ये दाखल

रशियन राष्ट्राध्यक्षतेहरान – युक्रेनच्या युद्धाची तीव्रता वाढत चाललेली असतानाच, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन मंगळवारी इराणची राजधानी तेहरानमध्ये दाखल झाले. इंधन तसेच आर्थिक सहकार्य, यावर राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्याशी चर्चा करणार आहेत. गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आखाती देशांचा दौरा करून रशिया व इराणविरोधात आघाडी भक्कम करण्याच्या दिशेने पावले टाकली होती. त्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्षांची ही इराण भेट अमेरिकेच्या आखातातील राजकारणाला छेद देण्यासाठीच आखण्यात आल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमांनी केले आहेत.

गेल्या महिन्यात तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथे आयोजित कॅस्पियन क्षेत्रातील देशांच्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची भेट झाली होती. युक्रेनमध्ये युद्ध पेटल्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच परदेश दौरा ठरला होता. पण रशियन राष्ट्राध्यक्ष सोव्हिएत मित्रदेशांच्या अर्थात रशियाच्याच प्रभावाखाली असलेल्या देशाच्या दौऱ्यावर असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमांनी केला होता. अशा परिस्थितीत, राष्ट्राध्यक्ष पुतिन मंगळवारी तेहरानमध्ये दाखल झाले तेव्हा याच पाश्चिमात्य माध्यमांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पहिल्या परदेश दौऱ्यावर असल्याचे प्रसिद्ध केले.

रशियन राष्ट्राध्यक्ष‘अस्ताना समिट’च्या निमित्ताने रशियन राष्ट्राध्यक्ष इराणच्या भेटीवर असल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे. सिरियातील संघर्षाच्या मुद्यावर राजधानी तेहरानमध्ये रशिया, इराण आणि तुर्कीच्या राष्ट्रप्रमुखांची त्रिपक्षीय बैठक पार पडणार आहे. तुर्कीने सिरियातील हल्ले बंद करावे आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी रशिया व इराणला सहाय्य करावे, अशी मागणी या बैठकीच्या निमित्ताने होणार असल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे. पण यानिमित्ताने रशियन राष्ट्राध्यक्ष इराणबरोबरचे सहकार्य वृद्धिंगत करण्यावर तसेच युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराण व तुर्कीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

युक्रेनमध्ये युद्ध पेटल्यापासून युक्रेन तसेच रशियातून निर्यात होणाऱ्या अन्नधान्याची जबरदस्त कोंडी झाली आहे. अमेरिका व युरोपिय देशांनी अन्नधान्याने भरलेल्या जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध टाकल्याचा आरोप रशिया करीतआहे. काही दिवसांपूर्वी असेच एक जहाज तुर्कीच्या बंदरात दाखल झाले होते. रशिया अन्नधान्याची निर्यात करण्यासाठी तयार आहे. पण त्यासाठी पाश्चिमात्य देशांनी सागरी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी रशिया करीत आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांच्याबरोबरच्या भेटीत हा प्रश्न उपस्थित करणार आहेत.

रशियन राष्ट्राध्यक्षतर या बैठकीच्या निमित्ताने रशिया व इराणचे राष्ट्राध्यक्ष काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करू शकतात, असा दावा केला जातो. राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणमध्ये दाखल होण्याआधी रशियाच्या गाझप्रोम व इराणच्या ‘नॅशनल इरानियन ऑईल कंपनी’ या इंधन कंपन्यांमध्ये 40 अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक करार झाला. इराणमधील इंधन आणि नैसर्गिक इंधनवायूच्या ठिकाणांच्या उत्खननासाठी रशियाने ही गुंतवणूक केली आहे. तर रशिया व इराण यांच्यात धोरणात्मक सहकार्यावरही चर्चा होऊ शकते.

दरम्यान, अस्ताना बैठकीच्या निमित्ताने रशिया आखातातील अमेरिकेच्या राजकारणाला छेद देण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत.

leave a reply