फ्रान्सचा युएईबरोबर इंधन सहकार्य करार

इंधन सहकार्य करारपॅरिस – ‘संयुक्त अरब अमिरात-युएई’चे सर्वेसर्वा शेख मोहम्मद बिन झाएद अल-नह्यान यांनी फ्रान्सचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतली. त्यांच्या या दौऱ्यात फ्रान्स आणि युएईमध्ये इंधन सहकार्य करार संपन्न झाला. युक्रेनच्या युद्धामुळे इंधनटंचाईला सामोरे जाणाऱ्या फ्रान्ससाठी हा करार दिलासा देणारा असल्याचा दावा केला जातो. तर शेख मोहम्मद बिन झाएद आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यातील ही भेट अमेरिकेसाठी इशारा असल्याचे अमेरिकन विश्लेषकांचे म्हणणे आहे.

इंधन, नैसर्गिक इंधनवायूचा पुरवठा निश्चित करण्यासंदर्भात सोमवारी फ्रान्स आणि युएईमध्ये ऊर्जा सहकार्य करार पार पडला. फ्रेंच इंधन कंपनी ‘टोटल एनर्जीज्‌‍’ आणि युएईची राष्ट्रीय इंधन कंपनी ‘एडीएनओसी’ यांच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आंतरराष्ट्रीय समुदाय, विशेषत: फ्रान्सच्या इंधन सुरक्षेला पाठिंबा देण्यासाठी युएई अतिशय उत्सूक असल्याचे शेख मोहम्मद यांनी या करारानंतर म्हटले आहे. तर सध्याच्या आव्हानात्मक काळात युएईबरोबरच्या या कराराचे आपल्या देशासाठी धोरणात्मक महत्त्व असल्याचे फ्रेंच परराष्ट्रमंत्री ब्रुनो ली मेर म्हणाले.

हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, अणुऊर्जा या क्षेत्रातही गुंतवणूक वाढविण्यासंबंधी उभय देशांच्या नेतृत्वात चर्चा झाली. इतर युरोपिय देशांप्रमाणे फ्रान्स देखील रशियाकडून आयात होणाऱ्या इंधनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. युरोपिय देशांनी रशियावर निर्बंध लादलेअसले तरी इंधनाची आयात रोखलेली नाही. पण लवकरच युरोपिय देश रशियन इंधनाच्या आयातीवर बंदी टाकणार आहेत. तर जर्मनीपाठोपाठ फ्रान्सला देखील इंधनाची मोठी टंचाई जाणवतअसल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत, युएईच्या राष्ट्रप्रमुखांनी फ्रान्सचा दौरा करुन इंधन सहकार्याबाबत केलेले करार अतिशय महत्त्वाचे ठरतात.

युएईच्या राष्ट्रप्रमुखांचा हा फ्रान्स दौरा अतिशय महत्त्वाचा असल्याचा दावा केला जातो. 1991 सालानंतर पहिल्यांदाच युएईच्या राष्ट्रप्रमुखांनी फ्रान्सला भेट दिली आहे. मे महिन्यात युएईचे माजी राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा यांचे निधन झाल्यानंतर शेख मोहम्मद बिन झाएद यांनी युएईची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर पहिल्यांदाच परदेश दौरा म्हणून शेख मोहम्मद यांनी फ्रान्सची निवड केली.

दरम्यान, ‘आत्तापर्यंत अमेरिका हा युएईचा सर्वात महत्त्वाचा सहकारी देश म्हणून पाहिले जात होते. पण गेल्या वर्षभरात बायडेन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अमेरिका हा काही युएईचा विश्वासपात्र सहकारी देश राहिलेला नाही. अशा परिस्थितीत, शेख मोहम्मद यांनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी फ्रान्सची केलेली निवड लक्ष वेधून घेणारी ठरते’, असे आंतरराष्ट्रीय विश्लेषिका ॲनी गॅडेल यांनी म्हटले आहे.

leave a reply