रशियाचे बाखमतवरील नियंत्रण युक्रेनचे धोरण अपयशी ठरल्याचे संकेत देणारे

- अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याचा दावा

वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – रशियन सैन्याने डोन्बासमधील बाखमत शहरावर मिळविलेला ताबा हा रशिया-युक्रेन युद्धातील निर्णायक टप्पा आहे. या घटनेने युक्रेनच्या सत्ताधारी राजवटीचे धोरण अपयशी ठरल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत, असा दावा अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकारी लेफ्टनंट कर्नल कॅरेन क्विआटकोव्स्की यांनी केला. तर बाखमतवरील रशियाचे नियंत्रण रशिया युद्ध जिंकत असल्याचे दाखवते, असे लष्करी विश्लेषक स्कॉट रिट यांनी सांगितले. तर रशियन सैन्यापुढे आता युक्रेनचे संभाव्य ‘काऊंटरऑफेन्सिव्ह’ परतविण्याचे उद्दिष्ट असून बाखमतमुळे त्याला गती मिळेल, असे संकेत रशियन विश्लेषकांनी दिले आहेत.

रशियासाठी बाखमतवरील विजय ही निर्णायक घटना असून डोन्बास क्षेत्रावर ताबा मिळविण्यासाठी या शहरावर नियंत्रण असणे महत्त्वाचे मानले जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून बाखमतसाठी सुरू असलेल्या

या लढाईची तुलना दुसऱ्या महायुद्धातील ‘स्टॅलिनग्रॅड’च्या लढाईशीदेखील करण्यात आली होती. स्टॅलिनग्रॅडच्या लढाईनंतर रशियाने जर्मनीचा पराभव करण्यात यश मिळविले होते. त्याच धर्तीवर रशिया युक्रेन व त्याला समर्थन देणाऱ्या पाश्चिमात्य देशांना मात देईल, असे दावे करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बाखमतमधील परिस्थिती कठीण झाल्याचे मान्य करणाऱ्या युक्रेनी नेतृत्त्वाने त्या भागातून माघार घेण्यास टाळाटाळ केली होती. त्यावरून युक्रेन व पाश्चिमात्य देशांमध्ये मतभेदही झाले होते.

युक्रेन सरकार व लष्कराकडून बाखमतसाठी करण्यात आलेली तैनाती तसेच शस्त्रसाठ्याचा वापर यावर पाश्चिमात्य देशांनी नाराजी व्यक्त केली होती.

युक्रेनने एका शहरासाठी जास्त मनुष्यबळ, शस्त्रसाठा व वेळ खर्ची घातल्यास रशियाविरोधातील प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेवर त्याचा परिणाम होईल याकडे पाश्चिमात्य विश्लेषक व तज्ज्ञांनी लक्ष वेधले होते. आता बाखमत गमावल्यानंतर पाश्चिमात्य माध्यमे व विश्लेषक युक्रेनचे धोरणच फसल्याचे दावे करीत आहेत.

leave a reply