अमेरिकेचा पापुआ न्यू गिनीबरोबर संरक्षण करार

पोर्ट मोरेस्बी – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी सोमवारी पापुआ न्यू गिनीचा दौरा करुन संरक्षण व सागरी सर्वेक्षणसंबंधी करारावर स्वाक्षरी केली. पॅसिफिक बेटदेशाबरोबरील हा करार म्हणजे सहकार्य असल्याचे सांगून ब्लिंकन यांनी चीनचा उल्लेख करण्याचे टाळले. पण पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने ‘पापुआ न्यू गिनी’बरोबर हा करार केल्याचा दावा अमेरिकन माध्यमे करीत आहेत.

अमेरिकेचा पापुआ न्यू गिनीबरोबर संरक्षण करारअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जपानमधील जी७ बैठकीत सहभाग घेतला होता. त्यानंतर ते पापुआ न्यू गिनी व ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार होते. पण ऑस्ट्रेलियातील नियोजित क्वाड बैठक टाळल्यानंतर बायडेन यांनी पापुआ न्यू गिनीचा दौरा करण्यास नकार दिला होता. चीनने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपला हा पॅसिफिक देशांचा दौरा टाळल्याच्या बातम्या आल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष बायडेन चीनविरोधात कठोर भूमिका टाळत असल्याची चर्चा सुरू झाली होती.

अशा परिस्थितीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी सोमवारी पापुआ न्यू गिनीचा दौरा करुन संरक्षण व सागरी सर्वेक्षणासंबंधी करार केला. सार्वभौम सहकारी देशांमधील हा करार असल्याचे ब्लिंकन यांनी यावेळी जाहीर केले. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे यांची भेट घेतली. त्याचबरोबर आर्थिक सहकार्यावरही ब्लिंकन यांनी चर्चा केल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिली. अमेरिकेचा पापुआ न्यू गिनीबरोबर संरक्षण करारया कराराद्वारे अमेरिका पापुआ न्यू गिनीच्या जवानांना प्रशिक्षण देणार असल्याचा दावा केला जातो.

यामुळे पापुआ न्यू गिनीतील अमेरिकेची सैन्यतैनाती वाढेल, अशी माहिती पंतप्रधान मरापे यांनी दिली. पापुआ न्यू गिनीमध्ये नौदलतळ उभारता यावे, यासाठी अमेरिका प्रयत्न करीत आहे. यासाठी अमेरिकेने ऑस्ट्रेलियाच्या मध्यस्थीने चर्चा सुरू केल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, असे असले तरी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपल्या देशाचा दौरा रद्द केल्यामुळे पापुआ न्यू गिनीच्या नेत्यांनी तसेच माध्यमांनी नाराजी व्यक्त केली होती. परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांचे विमानतळावर झालेले थंड स्वागत याची साक्ष देत असल्याचा दावा अमेरिकेतील वृत्तवाहिनीने केला.

हिंदी

 

leave a reply