रशियाचे युक्रेनवरील आक्रमण हा महासंघासाठी ‘वेकअप कॉल’

- जर्मन चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांचा दावा

प्राग – रशियाचे युक्रेनवरील आक्रमण हा युरोपिय महासंघातील निर्णयप्रक्रियेसाठी ‘वेकअप कॉल’ आहे, असा दावा जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी केला. पुढील काळात महासंघाने एकमताच्या निर्णयांऐवजी बहुमताच्या आधारावर निर्णय घ्यायला हवेत व त्यासाठी आवश्यक बदल करण्याची गरज असल्याचेही शोल्झ म्हणाले. महासंघाने विस्तारासाठी तयार रहावे व भविष्यात सदस्य संख्या 27वरून 36 वर गेलेली दिसेल, असे संकेतही शोल्झ यांनी दिले आहेत.

wakeup callझेक रिपब्लिकची राजधानी प्रागमधील एका कार्यक्रमात शोल्झ यांनी युरोपिय महासंघाच्या भवितव्याबाबत आपली भूमिका मांडली. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा उल्लेख करून ही बाब महासंघाला हलवून जागे करणारी घटना असल्याचा दावा त्यांनी केला. रशिया-युक्रेन युद्धाच्या कालावधीत महासंघाकडून घेण्यात येणारे निर्णय व त्याची प्रक्रिया यावर सवाल उभे राहिल्याकडे शोल्झ यांनी लक्ष वेधले.

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर युरोपिय महासंघाने रशियाविरोधात निर्बंधांची घोषणा केली होती. मात्र त्याच्या अंमलबजावणीदरम्यान महासंघाच्या सदस्य देशांमध्ये असलेले मतभेद समोर आले. काही क्षेत्रातील निर्बंध फक्त अमेरिकेच्या आग्रहावरून व दडपणाखाली लादण्यात येत असल्याची टीकाही झाली. गेल्या काही दिवसात महासंघाने लादलेले निर्बंध अपयशी ठरल्याचे अहवाल तसेच वक्तव्ये माध्यमांमधून समोर येत आहेत. या सर्व घटना महासंघाच्या कार्यपद्धतीवर शंका घेणाऱ्या ठरल्या असून सदस्य देशांमधूनच टीकेचा सूर तीव्र होऊ लागला आहे.

या पार्श्वभूमीवर जर्मन चॅन्सेलरनी महासंघाची निर्णयप्रक्रिया बदलण्याचे आवाहन केले आहे. एकमताने निर्णय घेण्याऐवजी बहुमताच्या प्रक्रियेचा वापर करायला हवा, असे शोल्झ यांनी सांगितले. त्याचवेळी महासंघाचा विस्तार करून तो अधिक संलग्न बनविण्यासाठी पावले उचलायला हवीत, असेही जर्मन चॅन्सेलर म्हणाले. महासंघ लवकरच सदस्य संख्येत विस्ताराची प्रक्रिया सुरू करणार असून युक्रेन, मोल्दोवा व जॉर्जिया या देशांचा त्यात समावेश असेल, असे शोल्झ यांनी नमूद केले. भविष्यात महासंघाची सदस्य संख्या 27वरून 30 व पुढे 36पर्यंतही जाऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले.

काही दिवसांपूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही महासंघातील बदलांबाबत प्रस्ताव मांडले होते. त्यानंतर आता जर्मनीनेही त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करून महासंघातील संभाव्य बदलांबाबत हालचाली सुरू झाल्याची जाणीव करून दिली.

leave a reply