फेडरल रिझर्व्हच्या दाव्यानंतर अमेरिकी डॉलरचे मूल्य वधारले

- पण सोन्याच्या दरासह आशियाई शेअरबाजारांमध्ये घसरण

An employee of a bank counts US dollar notes at a branch in Hanoiवॉशिंग्टन – महागाई रोखण्यासाठी व्याजदरात होणारी वाढ पुढील काही काळासाठी कायम ठेवण्याचे संकेत अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने दिले आहेत. या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत उसळले आहे. आशियाई बाजारपेठांमध्ये डॉलर 20 वर्षांमधील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. डॉलरचे मूल्य वाढल्याचा परिणाम इतर घटकांवर झाला असून सोन्यासह आशियाई शेअरबाजारांमध्ये घसरण दिसून आली. दरम्यान, या वर्षाच्या चौथ्या तिमाहित ब्रिटनला मंदीचा फटका बसेल, असे भाकित ‘गोल्डमन सॅक्स’ या वित्तसंस्थेने वर्तविले आहे.

Federal-Reserveअमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये महागाईचा विक्रमी भडका उडाला आहे. हा भडका रोखण्यासाठी अमेरिकेसह बहुतांश मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ करण्याचे सत्र सुरू केले होते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने गेल्या पाच महिन्यात चारवेळा व्याजदरात वाढ केली आहे. पण त्यानंतरही महागाईचा दर कमी झालेला नाही. असे असले तरी महागाई रोखण्यासाठी व्याजदरातील वाढ हेच प्रमुख शस्त्र असल्याचे मध्यवर्ती बँकांकडून ठासून सांगण्यात येत आहे. फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर जेरोम पॉवेल यांनीही अमेरिकेत पुढील काही महिने व्याजदरातील वाढ कायम ठेवणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

पॉवेल यांच्या वक्तव्याचे पडसाद आतरराष्ट्रीय स्तरावर उमटले आहेत. सोमवारी अमेरिकी चलन असणाऱ्या डॉलरचे मूल्य उसळले असून दोन दशकांमधील उच्चांकी स्तरावर पोहोचले. आशियाई बाजारपेठांमध्ये डॉलर इंडेक्स 109.44पर्यंत पोहोचला. आशियातील प्रमुख चलन असणाऱ्या जपानी येन, चीनचा युआन व भारतीय रुपयाच्या मूल्यात चांगलीच घसरण झाली. आशियाई चलनांपाठोपाठ युरो व इतर चलनांच्या मूल्यातही घसरणीस सुरुवात झाली आहे. आशियाई शेअरबाजारांमध्ये जपान, दक्षिण कोरिया व भारतातील शेअर निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली.

istockअमेरिका व युरोपिय बाजारपेठांमध्येही याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. अमेरिकेच्या ‘एस ॲण्ड पी 500’ तसेच ‘नॅस्डॅक 100’ या शेअरनिर्देशांकांमध्ये घसरण झाली. युरोपातील रोख्यांच्या बाजारपेठेतही व्याजदर वाढण्यास सुरुवात झाली आहे. चलन व शेअरबाजारांबरोबरच सोन्याच्या दरांवरही परिणाम दिसून आले. डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या दरांमध्ये 0.6 टक्क्यांची घसरण होऊन ते प्रति औंसामागे 1,722पर्यंत खाली आले. हा गेल्या महिन्याभरातील नीचांक ठरला आहे.

दरम्यान, अमेरिकेतील आघाडीची वित्तसंस्था ‘गोल्डमन सॅक्स’ने ब्रिटनच्या मंदीबाबत भाकित वर्तविले. इंधन व वीजेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनची अर्थव्यवस्था येत्या वर्षअखेरीस मंदीत जाईल, असे ‘गोल्डमन सॅक्स’ने बजावले. या वर्षाच्या चौथ्या तिमाहित ब्रिटनची अर्थव्यवस्था 0.6 टक्क्यांनी घसरेल, असे अमेरिकी वित्तसंस्थेने म्हटले आहे. यापूर्वीच्या अहवालात ब्रिटीश अर्थव्यवस्था एक टक्क्यांहून अधिक विकासदर गाठेल, असे ‘गोल्डमन सॅक्स’ने सांगितले होते.

leave a reply