सागरी क्षेत्र व मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी फिलिपाईन्स ‘साऊथ चायना सी’मधील आपल्या नौदलाची तैनाती वाढविणार

तैनातीमनिला – चीनने आपल्या तटरक्षक दलाला साऊथ चायना सी सागरी क्षेत्रासाठी धोकादायक ठरणार्‍या परदेशी जहाजांवर कारवाई करण्यासाठी दिलेले अधिकार अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा फिलिपाईन्सच्या लष्करप्रमुखांनी दिला आहे. चीनच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी फिलिपाईन्स ‘साऊथ चायना सी’मधील आपली नौदल तैनाती वाढविणार असल्याचे फिलिपिनी लष्करप्रमुख सिरिलितो सोबजना यांनी स्पष्ट केले. दरम्यान फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी, अमेरिकेला फिलिपाईन्सबरोबरील संरक्षण सहकार्य करार कायम ठेवायचा असल्यास अतिरिक्त निधी द्यावा लागेल, असे बजावले आहे.

गेल्या महिन्यात, चीनच्या तटरक्षकदलासाठी विशेष कायदा संमत करण्यात आला आहे. यानुसार, चीनच्या तटरक्षक दलाला परदेशी जहाजांच्या विरोधात शस्त्राचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ‘ईस्ट व साऊथ चायना सी क्षेत्रात परदेशी संघटना किंवा व्यक्तीकडून चीनचे सार्वभौमत्त्व, सार्वभौम अधिकार किंवा सागरी क्षेत्रांना धोका निर्माण झाला तर त्याविरोधात शस्त्राचा वापर करा’, असे आदेश या कायद्याद्वारे चीनने दिले आहेत. चीनच्या या धोरणावर आग्नेय आशियाई देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

तैनाती‘सागरी क्षेत्रात घुसखोरी केल्यास हल्ला चढविण्याबाबत चीनने केलेली घोषणा अतिशय धोकादायक आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फिलिपाईन्स साऊथ चायना सीमधील आपली नौदल तैनाती वाढविणार आहे. ही वाढीव तैनाती चीनविरोधात युद्ध छेडण्यासाठी नाही, तर फिलिपिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी असेल’, असे फिलिपिनी लष्करप्रमुख सिरिलितो सोबजना यांनी यांनी सांगितले. फिलिपाईन्सच्या परराष्ट्र विभागानेही चीनच्या तटरक्षक दलाला दिलेल्या अधिकारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘एखाद्या कायद्याची अंमलबजावणी सार्वभौम अधिकार असला, तरी चीनने उचललेली पावले फिलिपाईन्सच्या कायदेशीर हालचालींना थेट धोकादायक ठरू शकतात. चीनने तटरक्षक कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्यास त्याला तीव्र विरोध करण्यात येईल’, असे परराष्ट्र विभागाने बजावले आहे. दरम्यान, अमेरिका व फिलिपाईन्समध्ये असणार्‍या संरक्षण सहकार्य कराराच्या मुद्यावर फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.

अमेरिका व फिलिपाईन्समधील ‘व्हिजिटिंग फोर्सेस डील’ पुढे सक्रिय ठेवायचे असेल तर त्यासाठी अमेरिकेकडून अतिरिक्त निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे दुअर्ते यांनी बजावले आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी फिलिपाईन्सबरोबरील संरक्षण कराराबाबत वक्तव्य करताना, सदर करार अतिशय महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते. मात्र फिलिपाईन्समध्ये या मुद्यावर काही प्रमाणात नाराजी असून राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी अमेरिकेकडे केलेली मागणी त्याचाच भाग मानला जातो.

leave a reply