सौदीने हौथी बंडखोरांच्या कंट्रोल टॉवरवर हल्ले चढविले

कंट्रोल टॉवरवर हल्लेरियाध/एडन – सौदी अरेबिया आणि युएईतील प्रमुख शहरांसह लष्करी ठिकाणांवर ड्रोनद्वारे हल्ले चढविणार्‍या येमेनमधील हौथी बंडखोरांचे मोठे नुकसान झाले आहे. सौदी प्रणित अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने हौथी बंडखोरांच्या या ड्रोन्सना सूचना देणारे कंट्रोल टॉवरच उद्ध्वस्त केले. चार दिवसांपूर्वी हौथी बंडखोरांनी चढविलेल्या ड्रोन हल्ल्याला उत्तर म्हणून ही कारवाई केल्याचे अरब देशांच्या लष्करी आघाडीने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारी सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील अभा आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानतळावर ड्रोनचा हल्ला झाला होता. सौदीच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने वेळीच कारवाई करून हे ड्रोन नष्ट केले. पण या ड्रोनचे सुटे भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले होते. गेल्या काही आठवड्यांमध्ये हौथी बंडखोरांनी सौदीमध्ये चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात इतक्या मोठ्या संख्येने नागरिक जखमी होण्याची ही पहिली घटना होती.

या हल्ल्यावर जगभरातून टीका झाली होती. सौदी व अरब मित्रदेशांनी हौथी बंडखोरांना या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असे बजावले होते. सोमवारी सकाळी सौदी प्रणित अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने येमेनची राजधानी सनावर हवाई हल्ले चढविले. गेल्या पाच वर्षांपासून हौथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या राजधानी सनामध्ये ड्रोनचे नियंत्रण करणारे कंट्रोल टॉवर आहे. या इमारतीवर अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने निशाणा साधला.

कंट्रोल टॉवरवर हल्लेसौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हौथी बंडखोर येमेनच्या सरकारी टेलिकम्युनिकेशन मंत्रालयाचा वापर ड्रोन्सना नियंत्रित करण्यासाठी करीत होते. त्यामुळे सदर नियंत्रण कक्ष उद्ध्वस्त करणे आवश्यक होते, अशी माहिती सौदीच्या वृत्तसंस्थेने दिली. या कारवाईत कंट्रोल टॉवर म्हणून वापरली जाणारी इमारत पूर्णपणे नष्ट झाली आहे. अगदी पहाटेच्या वेळी ही कारवाई झाल्यामुळे जीवितहानी टळल्याचा दावा सौदीची माध्यमे करीत आहेत. तर या हल्ल्यात जीवितहानी झाल्याची शक्यता काही आखाती माध्यमे वर्तवित आहेत. काही दिवसांपूर्वीच सौदी व युएईने हवाई हल्ले चढवून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसाठी वापरले जाणारे अल-ज्वफ येथील हौथी बंडखोरांचे लष्करी तळ नष्ट केले होते.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांमध्ये हौथी बंडखोरांनी सौदी व युएईच्या राजधान्यांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले. यानंतर सौदी व युएईच्या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या क्षमतेत वाढ करण्याची मागणी वाढू लागली आहे. युएईने दक्षिण कोरिया आणि इस्रायलसह चर्चा सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तर अमेरिकेने देखील याच्या संदर्भात सौदीचे राजे सलमान यांच्याशी चर्चा केली. तसेच या दोन्ही देशांच्या हवाई सुरक्षेसाठी वेगाने पावले उचलण्याचे अमेरिकेने याआधीच जाहीर केले होते. यानुसार अमेरिकेने युएईमध्ये आपल्या हवाई दलाची एफ-२२ लढाऊ विमाने रवाना केली आहेत.

leave a reply