क्षेपणास्त्र चाचण्यांद्वारे उत्तर कोरिया चिथावणी देत आहे

- अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची टीका

क्षेपणास्त्र चाचण्याहोनोलुलू – गेले महिन्याभर क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावणारा उत्तर कोरिया आपल्या कारवाईने आंतरराष्ट्रीय समुदायाला चिथावणी देत असल्याची टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केली. त्याचबरोर उत्तर कोरियाच्या राजवटीने आपल्या बेकायदेशीर कारवाया थांबवून चर्चेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ब्लिंकन यांनी केले.

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे कोरियन क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने अमेरिकेवर मारा करणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी हवाई बेटांवर दक्षिण कोरिया आणि जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेऊन उत्तर कोरियाच्या धोक्याबाबत चर्चा केली. यानंतर तीनही परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त निवेदन जाहीर केले.

यामध्ये गेल्या महिन्याभरात उत्तर कोरियाने घेतलेल्या सात क्षेपणास्त्र चाचण्यांचा या तीनही देशांनी निषेध केला. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या या क्षेत्रात अस्थैर्य वाढविणार असल्याची टीका या देशांनी केली. तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर कोरियाच्या चाचण्या चिथावणखोर असल्याचा आरोप केला. या क्षेत्रात तणाव निर्माण करणार्‍या उत्तर कोरियावर कारवाई करण्यासाठी अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया काम करीत असल्याचे ब्लिंकन म्हणाले.

क्षेपणास्त्र चाचण्याकाही दिवसांपूर्वी अमेरिकेने उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित आठ जणांवर निर्बंध लादले होते. यामध्ये दोन कंपन्यांचाही समावेश होता. संबंधित व्यक्ती व कंपन्या रशिया आणि चीनशी जोडलेल्या होत्या. अमेरिकेच्या या निर्बंधांवर चीनने टीका केली होती. तसेच उत्तर कोरियावर कारवाई न करण्याची मागणी चीनने केली होती.

२०१७ सालापासून उत्तर कोरियाच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा वेग मंदावला होता, असा दावा अमेरिकी माध्यमांनी केला होता. पण गेल्या वर्षी अमेरिकेत बायडेन यांचे प्रशासन सत्तेवर आल्यानंतर उत्तर कोरियाचा विश्‍वास वाढला असून त्यांनी एकामागोमाग एक अशा क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावल्याचे अमेरिकी माध्यमे लक्षात आणून देत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेवर क्षेपणास्त्र हल्ले चढविण्याच्या धमक्या उत्तर कोरिया देत आहे.

दरम्यान, उत्तर कोरियाच्या नॉर्थ हामग्योंग प्रांतात सोमवारी दोन भूकंपाचे हादरे बसले. याच प्रांतात उत्तर कोरियाचा प्यूंगे-री अणुचाचणीचा तळ असून येथील ३७ किलोमीटर अंतरावर हे हादरे जाणवल्याचा दावा कोरियन माध्यमे करीत आहेत.

leave a reply