सौदीची भारतातील १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ‘ऑन ट्रॅक ’

- सौदीच्या राजदूतांचा निर्वाळा

नवी दिल्ली – भारताची अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येईल व भारतात सुमारे १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची सौदी अरेबियाची योजनाही पूर्णत्वास जाईल, असा विश्‍वास सौदीचे भारतातील राजदूत डॉ. सौद बिन मोहम्मद अल सती यांनी व्यक्त केला आहे. भारत सौदी अरेबियाचा धोरणात्मक भागीदार देश आणि निकटतम मित्रदेश आहे, असेही राजदूत अल सती यांनी स्पष्ट केले.

भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या सौदी अरेबियाच्या दौर्‍यामुळे पाकिस्तान अस्वस्थ बनला आहे. सौदी तसेच युएईसारख्या देशांवरील भारताचा प्रभाव वाढला असून पुढच्या काळात ही बाब पाकिस्तानसाठी घातक ठरेल, असा इशारा या देशाचे विश्‍लेषक देत आहेत. तर भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान आणि प्रभाव पाहता केवळ सौदीच नाही तर जगातला कुठलाही प्रमुख देश भारताचे महत्त्व नाकारू शकत नसल्याचा निर्वाळा पाकिस्तानातीलच काही समंजस विश्‍लेषकांनी दिलेला आहे. सौदीचे भारतातील राजदूत अल सती यांचे उद्गार याचीच साक्ष देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात सौदी अरेबियाचा दौरा केला होता. या दौर्‍यात सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी भारतात सुमारे १०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. पेट्रोकेमिकल्स, इंधन शुद्धीकरण प्रकल्प, पायाभूत सुविधा, खाण व उत्पादन क्षेत्र तसेच कृषी व इतर क्षेत्रात ही गुंतवणूक केली जाणार आहे. याचा फार मोठा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार आहे. मात्र कोरोनाच्या साथीमुळे सर्वच देशांचे अर्थव्यवहार ठप्प झाले होते. भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम दिसू लागला होता. अशा परिस्थितीतही सौदीची भारतातील गुंतवणुकीची योजना कायम असल्याची ग्वाही सौदीच्या राजदूतांनी दिली.

भारतीय अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येईल, भारतीय अर्थव्यवस्थेकडे ती क्षमता आहे, असा विश्‍वास राजदूत अल सती यांनी व्यक्त केला. तसेच सौदी भारतात करणार असलेल्या गुंतवणुकीच्या योजनेत कुठलेही बदल झालेले नसून ही गुंतवणूक ‘ऑन ट्रॅक’ असल्याचे असल्याचे अल सती यांनी स्पष्ट केले. याबरोबरच भारत हा सौदीचा धोरणात्मक भागीदार देश असून निकटतम मित्रदेश असल्याचे अल सती यांनी स्पष्ट केले. संरक्षणक्षेत्राशी निगडीत असलेले प्रशिक्षण, माहितीचे आदानप्रदान व दहशतवादविरोधी मोहीमेत सहकार्य, या आघाड्यांवर भारत व सौदी परस्परांना सहकार्य करणार असल्याचे अल सती यांनी म्हटले आहे.

थेट उल्लेख केला नसला तरी, भारतीय लष्करप्रमुखांच्या सौदी अरेबिया दौर्‍याचा अस्पष्टसा उल्लेख राजदूत अल सती यांच्या विधानातून मिळत आहे.या दौर्‍यात भारत आणि सौदी अरेबियाचे सामरिक पातळीवरील संबंध दृढ करण्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट होत आहे. दोन्ही देशांनी धोरणात्मक भागीदारी विकसित करण्यासाठी आयोग नेमण्याची तयारी केली आहे. यामुळे उभय देशांमधील सहकार्याची नवी दालने खुली होतील, असा विश्‍वास अल सती यांनी व्यक्त केला. त्याचवेळी या दशकात भारत आणि सौदीमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचलेले आहेत, याकडेही अल सती यांनी लक्ष वेधले. नुकतेच सौदीने आपल्या कामगारविषयक कायद्यात सुधारणा केली आहे. ही बाब भारत व सौदीमधील आर्थिक सहकार्य अधिकच भक्कम करणारी ठरेल, असा विश्‍वासही अल सती यांनी व्यक्त केला. सौदीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय कामगार असून पुढच्या काळात सौदीमध्ये अधिक प्रमाणात भारतीय कामगारांना रोजगार मिळू शकतो, असे संकेत अल सती यांच्याकडून दिले जात आहेत.

दरम्यान, भारताच्या सौदी तसेच युएई व इतर आखाती देशांबरोबरील सहकार्यात होणारी वाढ भारताचा आखाती क्षेत्रातील वाढता प्रभाव दाखवून देत आहे. विशेषतः पुढच्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेचे इंधनावरील अवलंबित्त्व कमी करण्यासाठी सौदी व इतर आखाती देशांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या आघाडीवर जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व दक्षिण आशियातील पहिल्या क्रमांकची अर्थव्यवस्था आपल्याला फार मोठे सहकार्य करू शकते, याची जाणीव सौदी व इतर आखाती देशांना झालेली आहे. तसेच सौदी हा भारताला इंधनाची निर्यात करणारा क्रमांक एकचा देश आहे. यामुळे सौदी अरेबिया भारताबरोबरील आपले सहकार्य अधिकाधिक दृढ करण्यासाठी वेगाने पावले उचलत असल्याचे दिसत आहे.

leave a reply