भारत-व्हिएतनाममध्ये सात सहकार्य करार संपन्न

नवी दिल्ली/हनोई – लडाखमध्ये ‘एलएसी’वरील तणाव वाढत असतानाच भारताने चीनवरील दडपण वाढविण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. सोमवारी भारताने चीनचा शेजारी देश असणार्‍या व्हिएतनामबरोबर संरक्षणक्षेत्रासह इतर क्षेत्रात सात करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया रोखण्यासाठी भारताने आग्नेय आशियाई देशांबरोबर सहकार्य वाढविण्यास सुरुवात केली असून व्हिएतनामबरोबरील सहकार्य करार हा त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरतो.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व व्हिएतनामचे पंतप्रधान एन्गुयेन शुआन फुक यांच्यात सोमवारी व्हर्च्युअल बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान संरक्षण, अर्थसहाय्य, अणुऊर्जा, इंधन, सौरऊर्जा, संयुक्त राष्ट्रातील सहकार्य व आरोग्य क्षेत्रातील करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. भारताच्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणाचा व्हिएतनाम हा महत्त्वाचा स्तंभ असल्याचा निर्वाळा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिला. तसेच व्हिएतनाम भारताच्या ‘इंडो-पॅसिफिक’ धोरणात व्हिएतनामला असाधारण स्थान असल्याचे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य व सुरक्षेसाठी भारत-व्हिएतनाम सहकार्य फार मोठी कामगिरी बजावू शकेल, असा विश्‍वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

या व्हर्च्युअल बैठकीत पंतप्रधान मोदी व पंतप्रधान एन्गुयेन शुआन फुक यांनी दोन्ही देशांमधील ‘व्हिजन डॉक्युमेंट’ आणि ‘प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन’ प्रदर्शित केले. दरम्यान, व्हिएतनामबरोबर सागरी वाद छेडून चीनने या देशावर आपल्या सामर्थ्याचे दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बलाढ्य चीनच्या नौदलाचा सामना करीत असताना, व्हिएतनाम अमेरिका व भारतासारख्या देशांकडून सहाय्याची अपेक्षा करीत आहे. अमेरिकेने याआधीचे व्हिएतनामबरोबरील बिघडलेले संबंध सुधारून धोरणात्मक सहकार्य विकसित केले आहेत. भारतही व्हिएतनामच्या सुरक्षेसाठी मोठे योगदान देत आहे.

यानुसार भारताने व्हिएतनामला गस्तीसाठी आवश्यक असलेल्या ‘हाय स्पिड’ बोटी पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी भारत व्हिएतनामला तब्बल दहा कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य पुरवित आहे. भारताची लार्सन अँड टुब्रो ही कंपनी आपल्या चेन्नईमधील प्रकल्पात व्हिएतनामसाठी पाच ‘स्पिड बोटस्’ची निर्मिती करीत आहे. या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली व्हिएतनाममध्ये उरलेल्या सात बोटींची निर्मिती केली जाईल.

भारताचे व्हिएतनामबरोबरील सहकार्य आपल्या विरोधात असल्याचा चीनचा समज आहे. म्हणूनच चीनने दोन्ही देशांबरोबरील या सहकार्याला कायम विरोधच केला. विशेषतः ‘साऊथ चायना सी’मधल्या व्हिएतनामच्या क्षेत्रात भारत करीत असलेल्या इंधनाच्या उत्खननावर चीनने सातत्याने आक्षेप?घेतला होता. मात्र चीनच्या विरोधाची पर्वा न करता दोन्ही देशांनी हे सहकार्य सुरू ठेवले होते.

leave a reply