सौदी-इस्रायलमधील सहकार्याने अरब-इस्रायल संघर्ष संपुष्टात येईल

इस्रायलचे पंतप्रधान नियुक्त बेंजामिन नेत्यान्याहू

जेरूसलेम – इस्रायलमध्ये सरकार स्थापित केल्यानंतर सौदी अरेबियाबरोबर पूर्ण राजकीय सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न करू. असे झाल्यास अरब-इस्रायलमधील गेल्या कित्येक दशकांचा संघर्ष संपुष्टात येईल. त्याचबरोबर पॅलेस्टिनींबरोबरच्या शांतीप्रक्रियेला देखील चालना मिळेल, असा दावा इस्रायलचे पंतप्रधान नियुक्त बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केला. सौदीबरोबरच्या सहकार्याबाबत बोलत असताना नेत्यान्याहू यांनी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने सौदीशी संबंध सुधारावे, असे आवाहन केले.

Netanyahu MBS Bidenगेल्या काही महिन्यांपासून इस्रायलमध्ये सत्तेवर असलेल्या बेनेट-लॅपिड यांच्या सरकारची परराष्ट्र भूमिका सुस्पष्ट नसल्याची टीका झाली होती. या सरकारने इराणविरोधात कठोर भूमिका घेण्याचे टाळले होते. त्याचबरोबर अब्राहम करारात सामील झालेल्या अरब देशांबरोबरचे सहकार्य वाढविण्यासाठी फारसे प्रयत्न केले नव्हते, अशी टीका झाली होती. अशा परिस्थितीत, इस्रायलमधील जहालमतवादी पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या आगामी परराष्ट्र भूमिकेबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची उत्सूकता वाढली आहे.

गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या माध्यमांशी बोलताना नेत्यान्याहू यांनी सौदी अरेबियाबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठासून सांगितले आहे. ‘अल अरेबिया’ या सौदी वृत्तवाहिनीशी बोलताना देखील नेत्यान्याहू यांनी सौदीबरोबरच्या सहकार्याचा मुद्दा उपस्थित केला. ‘सौदीबरोबरच्या सहकार्याने दोन उद्दिष्ट्ये गाठता येतील. सौदीसह सहकार्य प्रस्थापित झाल्यास थेट अरब-इस्रायलमधील संघर्ष संपुष्टात येऊन शांतता निर्माण होईल आणि यामुळे विचारही करता येणार नाही, असा मोठा बदल या क्षेत्रात पहायला मिळेल’, असा दावा नेत्यान्याहू यांनी केला.

त्याचबरोबर इस्रायल व पॅलेस्टाईनमधील रखडलेली शांतीचर्चा नव्याने सुरू होईल, असे नेत्यान्याहू म्हणाले. सहाजिकच इस्रायलबरोबर सहकार्य सुधारण्याचा निर्णय सौदीच्या नेतृत्वाला घ्यायचा आहे व माझ्या मते ते नक्कीच अब्राहम कराराला पसंती देतील, असा विश्वास नेत्यान्याहू यांनी व्यक्त केला. सौदीबरोबरच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करीत असताना नेत्यान्याहू यांनी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला चिमटे काढले. ‘आखातातील आपल्या पारंपरिक मित्रदेशांच्या सुरक्षेबाबत अमेरिका वचनबद्ध आहे, याबाबत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ठाम भूमिका स्वीकारावी. सौदीशी संबंध सुधारावे’, असे आवाहन नेत्यान्याहू यांनी केले.

या मुलाखतीच्या माध्यमातून इस्रायलचे पंतप्रधान नियुक्त नेत्यान्याहू यांनी इराणसह अमेरिकेलाही इशारा दिल्याचे दिसत आहे. इस्रायल व सौदीमधील सहकार्य इराणला आव्हान देणारे ठरू शकते. त्याचबरोबर बायडेन यांनी सौदी व इतर अरब देशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, असे सांगून इराणबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींना पूर्णविराम देण्याचे आवाहन केल्याचे दिसत आहे.

leave a reply