अमेरिकेचे युरोपिय देशांसंबंधातील धोरण मैत्रीपूर्ण राहिलेले नाही

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे टीकास्त्र

U.S. policyमॉस्को – ‘युरोपिय महासंघाचा आघाडीचा भागीदार असलेली अमेरिका युरोपिय देशांमधील उद्योगक्षेत्राला संपविणारी धोरणे राबवित आहे. युरोपिय देशांनी याबाबत आपल्या अमेरिकी मालकांकडे तक्रारही केली आहे. नाराज युरोपिय देशांनी अमेरिका अशी वागणूक का देते असे प्रश्नही विचारण्यास सुरुवात केली आहे. मात्र अमेरिकेचे पाय पुसणाऱ्या युरोपिय देशांना अजून कोणत्या वागणुकीची अपेक्षा आहे’, असा सवाल करीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युरोपिय देशांवर टीकास्त्र सोडले.

बायडेन प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात ‘इन्फ्लेशन रिडक्शन ॲक्ट’ला मंजुरी दिली असून ऊर्जा व पर्यावरणासाठी 369 अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे. ‘इन्फ्लेशन रिडक्शन ॲक्ट’च्या माध्यमातून अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहनांसह काही क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येणार आहे. ही बाब आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियमांच्या विरोधात असून अमेरिकेतील ‘ग्रीन इकॉनॉमी’ला अयोग्य पद्धतीने दिलेले समर्थन असल्याचा दावा युरोपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनला समर्थन देऊन आपली एकजूट दाखविणाऱ्या पाश्चिमात्य आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे उघड होत आहे.

Putin-russiaगेल्या महिन्यात युरोपिय महासंघाच्या बैठकीदरम्यान, महासंघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अमेरिका युरोपचा सहकारी राहिला आहे की नाही, अशा कडवट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अमेरिकेचा दौरा करणारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही अमेरिकेच्या धोरणांवरुन बायडेन प्रशासनाला खडसावले होते. ‘हवामानबदल रोखण्यासाठी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने काही पर्याय निवडले आहेत. हे पर्याय पाश्चिमात्यांच्या आघाडीचे तुकडे करणारे आहेत’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बजावले होते. युरोपातील ही नाराजी आता अधिक तीव्र होऊन ऐरणीवर येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांवरून स्पष्ट होत आहे.

हाच मुद्दा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीही उचलून धरला असून युरोपिय देशांच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या दबावाखाली येऊन युरोपिय देशांनी रशियावर निर्बंध लादले व त्याचा सर्वाधिक फटका युरोपिय देशांनाच बसत असल्याची जाणीव पुतिन यांनी यावेळी करून दिली. युरोपिय देशांमधील महागाईचा भडका रशियावरील निर्बंधांचे परिणाम असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

leave a reply