संरक्षण सहकार्यासाठी सौदी व युएईची अमेरिकेऐवजी फ्रान्स-इस्रायलशी हातमिळवणी

संरक्षण सहकार्यासाठीरियाध – काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सौदी अरेबिया आणि युएईला अत्याधुनिक संरक्षण साहित्य पुरविण्याची घोषणा केली होती. अमेरिका आपल्या आखाती मित्रदेशांच्या पाठिशी उभा असेल, असे आश्वासन बायडेन यांनी दिले होते. पण सौदी व युएईचा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांवर विश्वास राहिलेला नसल्याचे दिसत आहे. दोन्ही आखाती देशांनी इराणपासून असलेला धोका अधोरेखित करून आपल्या नौदल आणि हवाईदलासाठी दुसऱ्या देशांकडून खरेदी सुरू केली आहे. सौदी फ्रान्सकडून विनाशिका आणि युएई इस्रायलकडून स्पायडर हवाई सुरक्षा यंत्रणेची खरेदी करीत आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये इराणच्या लष्करी हालचालींनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. १ सप्टेंबर रोजी इराणच्या नौदलाने रेड सीच्या क्षेत्रात अमेरिकन नौदलातील दोन मानवरहीत ड्रोन जहाजांना ताब्यात घेतले होते. आठवड्याभरात इराणने अमेरिकी जहाजांविरोधात दोनवेळा अशी कारवाई केली होती. ४ सप्टेंबर रोजी इराणने रशियाकडून अतिप्रगत सुखोई-३५ लढाऊ विमानांची खरेदी करण्याचे संकेत दिले. तर पुढील काही तासात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी गस्तीनौका व्हर्टीकल प्रक्षेपण करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असल्याची घोषणा केली.

पर्शियन आखातापासून ते रेड सीच्या क्षेत्रातील इराणच्या या लष्करी हालचाली आपल्या व्यापारी हितसंबंधांसाठी धोकादायक असल्याचा आरोप सौदी, युएई व इतर अरब देश करीत आहेत. महिन्याभरापूर्वी आखाती देशांच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सौदी व युएईला सुरक्षा सहकार्य पुरविण्याचे जाहीर केले होते. पण अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेताच पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा काढून घेणाऱ्या बायडेन प्रशासनाने फार आधीच आखाती देशांचा विश्वास गमावल्याचा दावा केला जातो.

त्यामुळे अमेरिकेने आता कितीही आश्वस्त केले असले तरी इराणच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सौदी व युएई आपल्या सुरक्षाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी इतर देशांबरोबर सहकार्य वाढविण्याला अधिक महत्त्व देत आहेत. यासाठी हे दोन्ही देश आपल्या नौदल आणि हवाईदलाच्या क्षमतेत वाढ करीत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. इंधन संपन्न असलेले सौदी व युएई हे आत्तापर्यंत अमेरिकेकडून सर्वाधिक प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी करणारे देश होते. सौदीकडे अमेरिकन बनावटीची ‘एफ-१५’ लढाऊ विमाने, तर युएईकडे ‘एफ-१६’ विमानांचा ताफा आहे.

पण लवकरच युएई फ्रान्सकडून ८० रफायल विमानांची तसेच गोविंड श्रेणीतील विनाशिका खरेदी करीत आहे. तर युएईने इस्रायलकडून ‘स्पायडर’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी केल्याचेही आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. येमेनमधील हौथी बंडखोरांची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचे हल्ले रोखण्यात अमेरिकेची पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरल्यानंतर युएईने इस्रायलबरोबर हे सहकार्य वाढविल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत. तर युएईप्रमाणे सौदी देखील फ्रान्सकडून विनाशिकांची खरेदी करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

leave a reply