रशियातील शाळेत झालेल्या बेछूट गोळीबारात १३ जणांचा बळी

- दोन वर्षात रशियात घडलेली ‘मास शूटिंग’ची सातवी घटना

१३ जणांचा बळीमॉस्को – रशियाच्या इझेव्हस्क शहरातील शाळेत झालेल्या बेछूट गोळीबाराच्या घटनेत १३ जणांचा बळी गेला. यात सात लहान मुलांचा समावेश आहे. हल्लेखोराचे नाव आर्तेम कझान्स्तेव्ह असून त्याने नाझींची चिन्हे असणारे कपडे घातले होते, अशी माहिती रशियन यंत्रणांनी दिली. गेल्या पाच महिन्यात रशियातील शाळेत मास शूटिंग होण्याची ही दुसरी घटना ठरते. गेल्या दोन वर्षात रशियात ‘मास शूटिंग’च्या सात घटनांची नोंद झाली असून त्यात ४०हून अधिक जणांचा बळी गेला आहे.

उरल पर्वतरांगांजवळ असलेल्या उदमूर्तिआ प्रांतातील इझेव्हस्क शहरातील स्कूल नंबर ८८मध्ये हल्ल्याची घटना घडली. हल्लेखोर आर्तेम दोन भरलेली पिस्तुल्स घेऊन शाळेत घुसला. घुसल्यावर त्याने शाळेच्या सुरक्षारक्षकांसह दिसेल त्या व्यक्तीवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात सात मुलांसह दोन शिक्षक व दोन सुरक्षारक्षकांचा बळी गेला. त्यानंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडूनआत्महत्या केल्याची माहिती रशियन यंत्रणांनी दिली.

१३ जणांचा बळीहल्ल्यामागील उद्दिष्ट अजून स्पष्ट झालेले नसून हल्लेखोराने घातलेल्या कपड्यांवरील नाझी चिन्हांव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरुपाचा पुरावा अद्याप मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. हल्ल्यात २० जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे बळींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते. उदमूर्तिआ प्रांतात चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी या घटनेवर प्रतिक्रिया नोंदविली असून तीव्र शोक व्यक्त केला आहे.

रशियात गेल्या काही वर्षात मास शूटिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. २०२१ व २०२२ या दोन वर्षांमध्ये मास शूटिंगच्या सात घटनांची नोंद झाली असून त्यात ४३ जणांचा बळी गेला आहे. यापैकी तीन हल्ले शाळेत झाले आहेत. सोमवारी इझेव्हस्कमध्ये घडलेली घटना गेल्या तीन वर्षांमधील सर्वाधिक बळींची नोंद होणारी घटना ठरली आहे.

leave a reply