एससीओच्या बैठकीदरम्यान भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली

- चीनच्या सरकारी माध्यमांची तक्रार

नवी दिल्ली – एसीओच्या बैठकीआधी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांना एलएसीवरून कठोर शब्दात संदेश दिला. भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी यासंदर्भात केलेली विधाने कठोर आणि चिथावणीखोर असल्याची तक्रार चीनच्या सरकारी माध्यमांनी केली आहे. तर चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी मात्र एलएसीवरील परिस्थिती स्थीर असल्याचे सांगून द्विपक्षीय सहकार्याच्या चौकटीत राहून योग्यरितीने सोडविला जाईल, अशी समंजस भूमिका घेतल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला. त्यामुळे एलएसीबाबत भारत आक्रमक भूमिका घेत असल्याचा ठपका ठेवून चीन या वादाचे खापर भारतावर फोडण्याची तयारी करीत असल्याचे दिसते आहे.

शुक्रवारी शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओची बैठक पार पडली. या बैठकीत सहभागी झालेल्या रशिया, चीन, उझबेकिस्तान, कझाकस्तान, ताजिकिस्तान, किरगिझिस्तान तसेच इराणचे संरक्षणमंत्री सहभागी झाले होते. तर एससीओचा सदस्य असलेल्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हर्च्युअल माध्यमातून हजेरी लावली. यावेळी संरक्षणंमत्री राजनाथ सिंग यांची  रशिया, कझाकस्तान तसेच इराणच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा झाली. तर बैठकीच्या दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांच्याशी हस्तांदोलन करण्याचे टाळल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. याद्वारे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारताची नाराजी चीनच्या संरक्षणमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे दावे करण्यात येत आहेत.

तसेच गुरुवारी झालेल्या चर्चेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षणमंत्री ली शांगफू यांना द्विपक्षीय सहकार्यासाठी एलएसीवर शांतता व सौहार्द अत्यावश्यक असल्याचे बजावले होते. संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही बाब ठळकपणे मांडण्यात आली होती. हा संदेश देण्यासाठी भारताने कठोर शब्दांचा प्रयोग केला व ही भाषा चिथावणीखोर असल्याचे चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. इतकेच नाही तर भारत  आक्रमक भूमिका स्वीकारत असताना चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी मात्र एलएसीवरील परिस्थिती स्थीर असल्याचे सांगून हा वाद द्विपक्षीय चौकटीत सोडविण्याची समंजस भूमिका स्वीकारली, असा दावा ही माध्यमे करीत आहेत.

भारताने चीनच्या विरोधात अशी आक्रमक स्वीकारणे योग्य ठरत नाही, असे चिनी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply