रशिया व इराणच्या सहकार्याची व्याप्ती वाढली

मॉस्को/तेहरान – रशिया आणि इराण ‘राश्त-अस्तारा’ रेल्वे प्रकल्प सुरू करीत आहे. जागतिक दळणवळण सुविधांच्या क्षेत्रातील हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प ठरेल, असा दावा रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला. तर इराणच्या दौऱ्यात रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झँडर नोवाक यांनी दोन्ही देश मिळून १० इंधनतेल व इंधनवायू प्रकल्प विकसित करणार असल्याची घोषणा केली. तर रशियाच्या व्हीटीबी बँकेने इराणमध्ये आपली शाखा सुरू केली आहे. या साऱ्या बातम्या रशियाचे इराणबरोबरील सहकार्य प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे दाखवून देत आहे.

रशिया व इराणच्या सहकार्याची व्याप्ती वाढली‘राश्त-अस्तारा’ रेल्वे प्रकल्प दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरेल, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला. हा प्रकल्प भारत, इराण, अझरबैजान आणि रशियाला सागरी व लोहमार्गाने जोडेल, असे सांगितले जाते. याला सुएझ कालव्याइतके महत्त्व प्राप्त होईल, असा दावा रशियाकडून केला जातो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी यासंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडलेल्या या कार्यक्रमात रशियन राष्ट्राध्यक्षांनी हा प्रकल्प ‘नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट’चा भाग असल्याचे म्हटले आहे.

या प्रकल्पाच्या बातम्या येत असतानाच, रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झँडर नोवाक यांच्या इराण दौऱ्याची चर्चा सुरू झाली. रशियन उपपंतप्रधानांच्या या भेटीत दोन्ही देशांनी संयुक्तपणे १० इंधनतेल व इंधनवायू प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला. यानुसार रशिया इराणमधील सहा इंधनतेलाच्या विहिरी व दोन इंधनवायूच्या साठ्यांचे उत्खनन करणार आहे. यामुळे रशिया व इराणचे इंधनविषयक सहकार्य अधिकच भक्कम व व्यापक होईल. याच्या बरोबरीने रशियाची दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या व्हीटीबीने इराणमध्ये शाखा सुरू केल्याच्या बातम्या आल्या आहेत.

अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेची दैना उडली होती. इराणची इंधननिर्यात यामुळे बाधित झालेली आहे. अशा परिस्थितीत चीनने इराणमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करण्याची तयारी केली होती. रशिया व इराणच्या सहकार्याची व्याप्ती वाढलीपण दोन्ही देशांमधील हे गुंतवणूकविषयक सहकार्य अजूनही अपेक्षित वेग घेऊ शकलेले नाही. अशा परिस्थितीत रशियाने इराणशी सहकार्य वाढवित असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वीच हेरिटेड फाऊंडेशनच्या दोन अभ्यासकांनी रशियाच्या इराणबरोबरील सहकार्यापासून अमेरिकेने सावध रहावे, असे बजावले होते. या दोन्ही देशांचे सहकार्य आखाती क्षेत्रात फार मोठ्या उलथापालथी घडवित आहे. त्यामुळे अमेरिकने रशिया व इराणमधील हे सहकार्य रोखण्यासाठी वेळीच पावले उचलली नाहीत, तर आखाती क्षेत्रात हाहाकार माजेल. यामुळे इथला अमेरिकेचा प्रभाव संपुष्टात येईल, असे अभ्यासक जेम्स फिलिप्स आणि पीटर ब्रूक्स यांनी म्हटले होते.

इराण व सौदी अरेबियामधील वाटाघाटी चीनच्या मध्यस्थीने झाल्या असल्या, तरी त्यामागे इराण-रशिया सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच सिरिया १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा अरब लीगचा सदस्य बनला आहे, त्यामागे देखील रशिया व इराणचे सहकार्य असल्याचे या अभ्यासकांनी म्हटले आहे. म्हणूनच रशियाच्या इराणबरोबरील सहकार्याचे अमेरिकेवर होणारे दुष्परिणाम व अनर्थ टाळायचा असेल, तर अमेरिकेला आखाती क्षेत्रातील आपल्या सहकारी देशांना सोबत घेऊन योग्य ती पावले उचलावीच लागतील, असा निष्कर्ष या अभ्यासकांनी नोंदविला आहे. गेल्या काही दिवसात रशिया व इराणमधील सहकार्य लक्षात घेता, जेम्स फिलिप्स आणि पीटर ब्रूक्स यांनी दिलेला इशारा प्रत्यक्षात उतरू लागल्याचे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply