इराणच्या आक्रमक हालचालींमुळे अमेरिकेकडून इस्रायलला ‘संयुक्त लष्करी सहकार्याचा’ प्रस्ताव

वॉशिंग्टन/तेल अविव – इराणच्या अणुकार्यक्रमाचा वेग आणि आखाती क्षेत्रातील इराणच्या कारवायांची तीव्रता वाढत असताना, अमेरिकेने इस्रायलला संयुक्त लष्करी सहकार्याचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या आहेत. इस्रायल हा अमेरिकेचा सर्वात महत्त्वाचा सामरिक सहकारी देश आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे प्रशासन व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या सरकारचा विसंवाद दोन्ही देशांमधील सर्वच प्रकारच्या सहकार्यावर परिणाम करणारा ठरला. इराण तसेच पॅलेस्टिनी संघटना अमेरिका व इस्रायलमधील मतभेदांचा शक्य तितका लाभ घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत बायडेन प्रशासनाकडून नेत्यान्याहू यांच्या सरकारला मिळालेला हा लष्करी सहकार्याचा प्रस्ताव लक्ष वेधून घेणारा ठरतो.

इराणच्या आक्रमक हालचालींमुळे अमेरिकेकडून इस्रायलला ‘संयुक्त लष्करी सहकार्याचा’ प्रस्तावया प्रस्तावामध्ये संयुक्त युद्धसराव व लष्करी कारवाईचा समावेश असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख मार्क मिले, संरक्षणमंत्री ऑस्टिन लॉईड आणि अमेरिकेच्या सेंटकॉमचे कमांडर एरिक कुरिला यांनी इस्रायलला भेट दिली होती. या भेटीत सदर प्रस्ताव इस्रायलसमोर मांडण्यात आल्याचा दावा केला जातो. इस्रायलच्या एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली. इराणचा धोका वाढत असताना, सर्वच शक्यता लक्षात घेऊन त्याविरोधात लष्करी पूर्वतयारी करण्यासाठी आवश्यक योजना तयार करणे हे या प्रस्तावामागचे प्रमुख लक्ष्य आहे. सेंटकॉमच्या अधिकाऱ्यांनी इस्रायली वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

अमेरिकेकडून मिळालेल्या या प्रस्तावाकडे इस्रायल अतिशय सावधपणे पाहत आहे. हा सराव गोपनीय माहितीच्या आधारे केल्या जाणाऱ्या कारवायांचा असेल की यात केवळ संयुक्त युद्धसरावावर भर दिला जाईल, याबाबतची स्पष्टता इस्रायलला अपेक्षित आहे. हा युद्धसराव म्हणजे इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्याच्या पूर्वतयारीचा भाग नाही, असे अमेरिकेने आधीच स्पष्ट केलेले आहे. अशा परिस्थितीत इस्रायल आपल्या लष्करी तयारीची अधिक माहिती अमेरिकेसमोर उघड करण्यास तयार नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. इस्रायली वृत्तसंस्थेनेच तसा दावा केला.

यामुळे बायडेन प्रशासनावर अजूनही इस्रायलचे सरकार विश्वास ठेवायला तयार नसल्याचे उघड होत आहे. इराणच्या नौदलाने दोन इंधनवाहू जहाजे ताब्यात घेऊन आपण होर्मुझच्या आखातातून होणारी इंधनवाहतूक बंद पाडू शकतो, असा संदेश अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना दिला आहे. याची गंभीर दखल अमेरिकेने घेतली असून इराणला इशारा देण्यासाठी आपली युद्धनौका आखाती क्षेत्रासाठी रवाना केली आहे.

असे असले तरी अजूनही इस्रायल बायडेन प्रशासनावर विश्वास ठेवून लष्करी सहकार्याचा हा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार नाही. कारण अमेरिकेने दिलेल्या या प्रस्तावामुळे आपले हात बांधले जातील व आपण इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ले चढवू शकणार नाही, अशी चिंता इस्रायलला वाटत आहे. इस्रायली वृत्तसंस्थेने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देऊन, ही माहिती प्रसिद्ध केली. यामुळे इस्रायलच्या सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध असल्याची ग्वाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देत असले, तरी इस्रायल त्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यास तयार नसल्याची बाब यामुळे जगासमोर आली आहे.

हिंदी

 

leave a reply