चीन, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दावे

बीजिंग/सेऊल – शनिवारी जगभरात कोरोनाव्हायरसमुळे चार हजाराहून अधिक जण दगावले असून जगभरातील बळींची एकूण संख्या २,८०,७०२ वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात सुमारे ८९ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये चीन, दक्षिण कोरियातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांचा समावेश असल्याची भयावह शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाव्हायरसच्या साथीने गेल्या चोवीस तासात अमेरिकेत १,५६८ जणांचा बळी घेतला आहे. याबरोबर अमेरिकेतील या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या ८० हजारांच्या पुढे गेली आहे. तर अमेरिकेतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १३,४७,१६७ इतकी झाली असून शनिवारी यामध्ये २५ हजार नव्या रुग्णांची भर पडली. तर ब्रिटनमध्ये गेल्या चोविस तासात ३४६ जण दगावले आहेत. त्याचबरोबर शनिवारी इटलीत १९४, स्पेनमध्ये १७९ जणांचा बळी गेला, अशी माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली.

ब्राझिलमध्ये या साथीच्या बळींची संख्या वाढली आहे. गेल्या चोवीस तासात ब्राझिलमध्ये ७३४ जण या साथीने बळी गेला असून १०,६५१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ब्राझिलमधील एकूण बळींची संख्या १०,६५६ तर कोरोनाबाधितांची संख्या १,५६,००० वर गेली आहे. तर रशियामध्ये सलग सातव्या दिवशी दहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून या देशातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या २,०९,००० वर पोहोचली आहे.

शनिवारी चीनच्या वुहान शहर तसेच इतर भागात कोरोनाचे १४ नवे रुग्ण आढळले आहेत. पण हे रुग्ण दुसऱ्या देशातून इथे आल्याचा दावा चीनच्या यंत्रणांनी केला. पण चीनची माध्यमे मात्र या चौदा नव्या रुग्णांपैकी बारा जण स्थानिकच असल्याचे सांगत आहेत. ज्या वुहान शहरातून कोरोनाचा उगम झाला ते शहर आता कोरोनाच्या साथीपासून पूर्णपणे मुक्त झाल्याचा गाजावाजा, चीनने जगभरात केला होता. मात्र, हा प्रचार आता चीनवरच उलटणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. कारण वुहान शहरात कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने या साथीची दुसरी लाट आल्याचे उघड झाले आहे.

चीनप्रमाणे दक्षिण कोरियातही कोरोनाचे ३४ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आपल्या देशात धडकल्याची चिंता काही कोरियन विश्लेषक व्यक्त करीत आहेत. तर कोरोनाची साथ ओसरली असल्याचे जाहीर करुन लॉकडाउन शिथिल करण्याची घाई केल्यामुळेच आपल्या देशावर ही वेळ ओढावल्याचा दावा दक्षिण कोरियन यंत्रणा करीत आहेत.

leave a reply