अमेरिकेत विघटनवादाला पाठिंबा देणार्‍यांच्या संख्येत वाढ

- ‘युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया’चा अहवाल

विघटनवादवॉशिंग्टन – अमेरिकेतील दोन्ही प्रमुख पक्षाच्या समर्थकांमध्ये देशाचे विभाजन करण्यात यावे, असे मत मांडणार्‍यांची संख्या वाढली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन करणारे रिपब्लिकन मतदार आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षातील समर्थकांनी दोन स्वतंत्र देशांच्या निर्मितीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर पॉलिटिक्स’ने सादर केलेल्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यात अमेरिकेच्या विघटनासंदर्भात प्रसिद्ध झालेला हा दुसरा अहवाल ठरतो.

व्हर्जिनिया विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर पॉलिटिक्स’ने ‘प्रोजेक्ट होमफायर इनिशिएटिव्ह’ व ‘इनोव्हेट एमआर’ यांच्या सहाय्याने अमेरिकेतील तीव्र राजकीय मतभेदांच्या मुद्यावर अभ्यास सुरु केल्याचे म्हटले आहे. या अभ्यासात, अमेरिकेतील राजकीय मतभेद अधिकाधिक तीव्र बनत चालल्याचे संकेत मिळत आहेत, असा दावा ‘सेंटर फॉर पॉलिटिक्स’चे प्रमुख लॅरी जे. सॅबाटो यांनी केला. ‘ट्रम्प व बायडेन यांना मतदान करणार्‍यांमधील मतभेदांची व्याप्ती अधिकच तीव्र व धोकादायक स्तरावर गेली आहे. ही दरी इतकी रुंदावली आहे की ती सहजपणे भरून काढता येणे शक्य नाही’, असे सॅबाटो यांनी बजावले आहे.

विघटनवादमाजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे समर्थन करणार्‍या ५२ टक्के तर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना मतदान केलेल्या ४१ टक्के समर्थकांनी, अमेरिकेच्या विभाजनाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पार्टीचे नियंत्रण असलेली ‘रेड स्टेट्स’ व डेमोक्रॅट पार्टीचे नियंत्रण असणारी ‘ब्ल्यू स्टेट्स’ अशा दोन स्वतंत्र देशांमध्ये अमेरिकेचे विघटन होऊ शकते, असे मत समर्थकांनी नोंदविल्याचे ‘सेंटर फॉर पॉलिटिक्स’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दोन्ही पक्षांमधील ४० टक्क्यांहून अधिक मतदारांनी राष्ट्राध्यक्षांच्या हाती सर्वाधिकार देण्याला पाठिंबा दिल्याचेही उघड झाले आहे.

दोन्ही पक्षांमधील ७५ टक्क्यांहून अधिक समर्थकांनी, दुसरा पक्ष अमेरिकेसाठी मोठा धोका असल्याचे बजावले. रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांनी डेमोक्रॅट पक्षाची तुलना समाजवाद्यांशी केली आहे. तर डेमोक्रॅट पक्षाच्या समर्थकांनी रिपब्लिकन पक्षाचा उल्लेख ‘फॅसिस्ट’ असा केला आहे. गरज पडल्यास लोकशाही मूल्ये व नियम बाजूला ठेऊन आपला अजेंडा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यासही दोन्ही पक्षाच्या मतदारांनी समर्थन दिले आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर नजिकच्या काळात दोन्ही पक्षांमध्ये समान मूल्यांवर व मुद्यांवर काम करणारे समन्वयवादी नामशेष होतील, अशी भीती ‘सेंटर फॉर पॉलिटिक्स’ने व्यक्त केली आहे.

जुलै महिन्यात, ‘ब्राईट लाईन वॉच’ व ‘यु गव्ह’ या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून अमेरिकेतील विघटनवादाच्या मागणीचे चित्र समोर आले होते. त्यात, अमेरिकेच्या दक्षिण भागातील प्रांतांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या तब्बल ६६ टक्के समर्थकांनी ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’पासून वेगळे होण्याच्या मुद्याला समर्थन दिले होते. कोणत्याही पक्षाचे समर्थक नसलेल्या ‘इंडिपेंडंट’ विचारसरणीच्या नागरिकांपैकी ५० टक्के जणांनीही वेगळे होण्याची मागणी उचलून धरली होती. डेमोक्रॅट पक्षाचे आधारस्तंभ मानले जाणार्‍या पश्‍चिम व ईशान्य अमेरिकेतील प्रांतांमध्येही सुमारे ४० टक्के समर्थकांनी वेगळे होण्याच्या मुद्याला पाठिंबा दिल्याचे उघड झाल होते.

leave a reply