व्हेनेझुएलात सहा शून्य कमी केलेल्या नव्या चलनाचा वापर सुरू

चलनाचा वापरकॅराकस – शुक्रवारपासून व्हेनेझुएलात सहा शून्य कमी केलेल्या नव्या बोलिव्हर चलनाचा वापर सुरू झाला आहे. गेल्या १३ वर्षात अशा रितीने शून्य कमी करण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. यापुढे १०० बोलिव्हरची नोट सर्वाधिक रक्कम ठरणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील त्याचे मूल्य २५ डॉलर्सहून कमी असेल, असे सांगण्यात येते.

२०१३ सालापासून व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. गेल्या आठ वर्षात देशाचा ‘जीडीपी’ ८० टक्क्यांनी घसरला आहे. बोलिव्हर चलनाच्या मूल्यातही प्रचंड घसरण सुरू असून या वर्षातच मूल्य ७३ टक्क्यांनी घसरल्याचे सांगण्यात येते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील महागाईचा दर तब्बल ५,५०० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. या वाढत्या महागाईमुळे साधा ब्रेड विकत घेण्यासाठीही लाखो बोलिव्हर इतकी मोजावी लागत आहे.

त्यामुळे व्हेनेझुएलातील बहुतांश नागरिकांनी अमेरिकी डॉलर तसेच इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा वापर सुरू केला आहे. मात्र वाढती महागाई व घसरत्या चलनच्या पार्श्‍वभूमीवर व्हेनेझुएलातील बँकांसमोर नोटांची मोजदाद करण्याचे प्रचंड आव्हान उभे ठाकले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने शून्य कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. मात्र शून्य कमी करुन नवे चलन दाखल केल्याने देशातील आर्थिक समस्या सुटणार नसल्याचा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे.

चलनाचा वापरव्हेनेझुएलाचे हुकुमशहा निकोलस मदुरो यांच्या धोरणामुळे देशात राजकीय अस्थैर्य असून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यात कोरोनाच्या साथीची भर पडल्याने परिस्थिती अधिकच बिघडल्याचे मानले जाते. गेली काही वर्षे देशात महागाई भयावह प्रमाणात वाढत असून यावर्षी महागाई तब्बल २,३०० टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात येते. घसरती अर्थव्यवस्था व महागाई यावर मात करण्यासाठी गेल्या वर्षी व्हेनेझुएला सरकारने क्रिप्टोकरन्सीचेही सहाय्य घेतले होते. मात्र हा उपायही फारसा यशस्वी ठरलेला नाही. गेल्या १३ वर्षांमध्ये तिसर्‍यांदा चलनातील शून्य हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी व्हेनेझुएलाचे दिवंगत हुकुमशहा ह्युगो चावेझ यांच्या कार्यकाळात २००८ साली तीन शून्य कमी करण्यात आले होते. त्यानंतर मदुरो यांनी २०१८ साली पाच शून्य कमी केले होते. मात्र त्यानंतरही परिस्थिती बदलली नसून उलट अधिकच बिघडत चालली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघटना व इतर जागतिक संघटनांनी दिलेल्या विविध अहवालांनुसार, व्हेनेझुएलात अराजकसदृश परिस्थिती असून जवळपास ५० लाखजणांनी हा देश सोडल्याचे सांगण्यात येेते. गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात निर्बंधही लादले असून त्यामुळे इंधनक्षेत्र, पर्यटन, खनिज क्षेत्र या सर्वांची वाताहत झाल्याचे मानले जाते. इंधन व इतर नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, त्यामागे राजकीय कारणे असल्याचे याआधीही स्पष्ट झाले होेते.

leave a reply