महाराष्ट्रातील सात नव्या रुग्णांसह; भारतातील ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली

- नीति आयोगाच्या व्ही.के.पॉल यांच्याकडून इशारा

नवी दिल्ली/मुंबई – देशातील कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. शुक्रवारी मुंबईतील धारावीसारख्या अत्यंत गजबजलेल्या परिसरात ‘ओमिक्रॉन’चा रुग्ण आढळला असून मुंबईत आढळलेला हा तिसरा रुग्ण आहे. महाराष्ट्रात दिवसभरात ‘ओमिक्रॉन’चे एकूण सात नवे रुग्ण आढळले. या पार्श्‍वभूमीवर मास्कचा वापर कमी झाल्याबद्दल सरकारने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू नयेत म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आवश्यक आहे. दुसर्‍या लाटेपूर्वी अशाच प्रकारे मास्कचा वापर कमी झाला होता, याची आठवण करून देत आपण पुन्हा एकदा त्या भयावह परिस्थितीकडे नेणार्‍या मार्गाने जात आहोत, असा इशारा नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील सात नव्या रुग्णांसह; भारतातील ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली - नीति आयोगाच्या व्ही.के.पॉल यांच्याकडून इशाराजगभरात ‘ओमिक्रॉन’ रुग्ण वाढत आहेत. डेल्टा व्हेरिअंटपेक्षा कितीतरी वेगाने संक्रमण पसरविणारा हा व्हेरिअंट असल्याचा दावा करण्यात येतो. गेल्या आठवड्यात कर्नाटकात भारतातील ऑमिक्रॉनचे पहिले दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, दिल्लीमध्ये या व्हेरिअंटचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. तर गुजरातमधील रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. पाच दिवसांपूर्वी गुजरातमध्ये सापडलेल्या एका रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे गुरुवारी जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल समोर आल्यावर लक्षात आले होते. त्यानंतर शुक्रवारी मुंबईत धारावीतही एक रुग्ण आढळला आहे.

धारावीतील रुग्ण ४ डिसेंबरला टांझानियामधून परतला होता. यावेळी त्याची एअरपोर्टवर आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाचे नमुने कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्स तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये या रुग्णाला कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अहवाल आल्यावर या रुग्णाला पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाला विमानतळावर आणण्यासाठी त्याचे दोन मित्र आले होते. त्यांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच मुंबईत आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ओमिक्रॉन’चे चार नवे रुग्ण आढळले. या सर्वांचे तपशील समोर आलेले नाहीत. मात्र शुक्रवारी सापडलेल्या ‘ओमिक्रॉन’च्या सात नव्या रुग्णांपैकी चार जणांचे पूर्ण लसीकरण झालेले होते. एका साडेतीन वर्षाच्या लहानमुलीला ‘ओमिक्रॉन’ची लागण झाली आहे. याआधी पुणे जिल्ह्यात ‘ओमिक्रॉन’ सात रुग्ण आढळले होते. यातील सहा पिंपरी-चिंचवडमध्ये सापडले होते.

भारतात आतापर्यंत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’च्या सर्व रुग्णांमध्ये खूप सौम्य लक्षणे आढळून आली आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. तसेच ‘ओमिक्रॉन’मुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण आतापर्यंत तरी वाढलेला नाही. पण आपल्याला जास्त जागरुक राहण्याची आवश्यकता असल्याचे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले आहे. तसेच नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुपकडून (एनटीएजीआय) अद्याप लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकार्‍याने दिली आहे.

दरम्यान, लोकसभेत कोरोना लसीच्या बुस्टर डोससंदर्भात चर्चा झाली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सध्या सरकारचा सर्व भर लवकरात लवकर सर्व पात्र जनसंख्येचे लसीकरण पुर्ण करण्याकडे असल्याचे स्पष्ट केले. देशात १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या ९३ कोटी ९० लाख आहे. यातील १३ कोटी ३० लाख जणांनी अद्याप एकही लस घेतलेली नाही. तर पात्र लोकसंख्येपैकी ५३ टक्के जनतेने लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती मंडाविया यांनी दिली. तसेच बुस्टर डोसचा निर्णय तज्ज्ञांच्या शिफारसीनंतरच घेतला जाईल, असेही अधोरेखित केले.

leave a reply