सौदीच्या क्राऊन प्रिन्सची कतारला भेट

- आखातात स्थैर्य प्रस्थापित करण्यावर एकमत

कतारला भेटदोहा – गेल्या चार दिवसांपासून अरब मित्रदेशांच्या दौर्‍यावर असलेले सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी कतारला भेट दिली. गेल्या चार वर्षांमधला क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा हा पहिला कतार दौरा ठरतो. कतारचे अमिर शेख तमिम बिन हमाद अल-थानी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये आखातात स्थैर्य प्रस्थापित करण्यावर एमकत झाले. सौदीच्या क्राऊन प्रिन्सचा हा कतार दौरा लक्षवेधी असल्याचा दावा आखाती माध्यमे करीत आहेत.

२०१७ सालापासून सौदी व कतारमधील संबंध ताणले गेले होते. इराण व इराणसमर्थक हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेबरोबर सहकार्य प्रस्थापित केल्याचा ठपका ठेऊन सौदी अरेबिया व सौदीच्या अरब मित्रदेशांनी कतारवर राजकीय तसेच व्यापारी बहिष्कार टाकला होता. कतारची माध्यमे इराणसमर्थक दहशतवादी संघटनांचे समर्थन करीत असल्याचा आरोप सौदीने केला होता. त्याचबरोबर ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी’ या अरब-आखाती देशांच्या गटातूनही कतारला वगळले होते. सौदीप्रणित अरब मित्रदेशांच्या आघाडीने कतारची कोंडी केली होती. यामुळे सौदी व कतारमधला तणाव प्रचंड प्रमाणात वाढला होता.

कतारला भेटपण २०२१ च्या सुरुवातीला सौदीमध्ये पार पडलेल्या ‘जीसीसी’ सदस्य देशांच्या बैठकीसाठी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी कतारच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. त्यावेळी सौदीचे क्राऊन प्रिन्स स्वत: विमानतळावर शेख तमिम बिन हमाद यांच्या स्वागतासाठी गेले होते. यानंतर दोन्ही देशांचे संबंध सुरळीत होऊ लागल्याचे दिसत आहे. बुधवारी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे दोहा विमानतळावर आगमन झाल्यानंतर शेख तमिम त्यांच्या स्वागतासाठी उभे होते.

यावेळी शेख तमिम यांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्सचा उल्लेख आपले बंधू असा केला. तसेच उभय देशांमधील संबंध इतिहासाच्या भक्कम पायावर आधारलेले आहेत, असे शेख तमिम म्हणाले. सौदी व कतारच्या नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा पार पडल्याचा दावा केला जातो. यानंतर दोन्ही नेत्यांनी पर्शियन आखातातील स्थैर्य व सुरक्षेच्या मुद्यावर एकमत झाल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर कतारला भेटउभय देशांमधील आर्थिक व व्यापारी सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती जाहीर करण्यात आली. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी कतारच्या राष्ट्रप्रमुखांना जीसीसीच्या पुढील बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

लेबेनॉन, इराक आणि येमेनच्या मुद्यांवरही दोन्ही देशांमध्ये एकमत असल्याचे सौदीच्या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले. लेबेनॉनमधील अस्थैर्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी किंवा इतर देशांवर हल्ले चढविण्यासाठी होऊ शकतो, हे लक्षात घेऊन क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान व शेख तमिम बिन हमाद यांनी यावर चर्चा केल्याचे सांगितले जाते. तर इराकमधील निवडणुकीचे निकाल आपल्याला मान्य असल्याचे दोन्ही नेत्यांनी कतारला भेटस्पष्ट केले. येमेनचा मुद्दा राजकीय वाटाघाटींनी सोडविण्यावरही चर्चा पार पडल्याचे सौदीच्या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

लेबेनॉनमध्ये हिजबुल्लाह या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेचे वर्चस्व आहे. तर इराकमधील निवडणूकांचे निकाल इराणला मान्य नाहीत. येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी याआधीच सौदीचा संघर्षबंदीचा प्रस्ताव धुडकावला आहे. अशा परिस्थितीत, सौदी व कतारच्या नेत्यांमधील ही भेट या क्षेत्रातील इराणच्या हितसंबंधांना धक्का देणारी असल्याचा दावा आखातातील विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply