सुदानमध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर पंतप्रधानांसह अनेक नेत्यांना अटक

खार्तुम – आफ्रिकेतील सुदानमध्ये सोमवारी सकाळी लष्कराने बंड करून सत्ता ताब्यात घेतली आहे. सुदानच्या लष्कराचे प्रमुख जनरल अब्देल फताह बुर्‍हान यांनी, बंडाची माहिती देतानाच आणीबाणीची घोषणा केली आहे. लष्कराने पंतप्रधान अब्दलाह हम्दोक यांच्यासह वरिष्ठ मंत्र्यांना अटक करून अज्ञात स्थळी नेल्याचे समोर आले आहे. लष्कराच्या या बंडानंतर राजधानी खार्तुमसह काही शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. गेल्याच महिन्यात पंतप्रधान हम्दोक यांनी लष्करी बंडाचा प्रयत्न उधळल्याची माहिती दिली होती. या पार्श्‍वभूमीवर सोमवारची बंडाची घटना लक्ष वेधून घेणारी ठरते.

सुदानमध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर पंतप्रधानांसह अनेक नेत्यांना अटकदोन वर्षांपूर्वी सुदानचे तत्कालिन हुकुमशहा ओमर अल बशिर यांची सत्ता उलथविण्यात आली होती. त्यानंतर सुदानची सूत्रे लष्कर व राजकीय गटांचा समावेश असलेल्या संयुक्त हंगामी सरकारच्या ताब्यात देण्यात आली आहेत. पंतप्रधान अब्दलाह हम्दोक या सरकारचे नेतृत्त्व करीत असून राजकीय हस्तांतरण व लोकशाहीवादी सरकारस्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. मात्र गेल्या वर्षभरात सरकारमधील अंतर्गत संघर्ष सातत्याने ऐरणीवर येत असून त्यामुळे लोकशाहीवादी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचा दावा केला जातो.

राजकीय गटांचे समर्थक व लष्करी राजवटीचे समर्थक असे उघड तट पडले असून दोन्ही गटांकडून सातत्याने निदर्शने सुरू आहेत. गेल्याच महिन्यात लष्करातील एका गटाने पंतप्रधान हम्दोक यांची सत्ता उलथविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो उधळून लावल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली होती. या फसलेल्या बंडानंतर लष्कराचे समर्थक असणार्‍या गटांनी ऑक्टोबर महिन्यात निदर्शनेही केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राजकीय गटांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात व्यापक आंदोलन सुरू केले होते. एकापाठोपाठ होणार्‍या निदर्शनांमुळे परिस्थिती अस्थिर बनली असतानाच लष्कराने बंड करून नवा धक्का दिल्याचे दिसत आहे.

सुदानमध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर पंतप्रधानांसह अनेक नेत्यांना अटकसुदानच्या लष्कराचे प्रमुख जनरल अब्देल फताह बुर्‍हान यांनी, राजकीय गटांमधील संघर्ष तीव्र झाल्याने लष्कराला हस्तक्षेप करून सत्ता ताबत घ्यावी लागल्याचे सांगितले आहे. देशात आणीबाणी घोषित करण्यात आली असून इंटरनेटसह बाह्य देशांशी असलेला इतर संपर्कही तोडण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या बंडावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, युरोपिय महासंघ, आफ्रिकन युनियनने राजकीय नेत्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. अमेरिकेच्या दूतावासाने आपल्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे.

सुदानमधील बंडामागे गेल्या वर्षी इस्रायलबरोबर झालेला शांतीकरार हा घटकदेखील कारणीभूत असल्याचे मानले जाते. सुदानच्या लष्कराने इस्रायल व अमेरिकेबरोबरील संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला आहे. मात्र सुदानमधील राजकीय गट त्यासाठी फारसे उत्सुक नसून वर्षभरात इस्रायलबरोबरील संबंध सुधारण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. दुसर्‍या बाजूला सुदानी लष्करातील अधिकारी इस्रायलमधील अधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेत असल्याने राजकीय गटांशी निगडित नेते नाराज असल्याचे सांगण्यात येते. ‘इस्रायल हायोम’ या वेबसाईटने यासंदर्भात दावा केला असून, लष्करी राजवटीत सुदान व इस्रायलमधील संबंध सुधारण्यास सहाय्य होईल, असे संकेत दिले आहेत.

leave a reply