आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय गव्हाचे मूल्य आणि मागणी वाढली

- दक्षिण आणि पश्‍चिम आशियाई देशात गव्हाच्या निर्यातीत वाढ

नवी दिल्ली – दक्षिण आशिया आणि हिंंदी महासागर क्षेत्रातील देशांमध्ये भारत प्रमुख गहू पुरवठादार देश म्हणून उदयास आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या किंमती वाढल्या आहेत. याचे प्रमुख कारण यावर्षात जागतिक पातळीवर गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अमेरिका, कॅनडासारख्या देशांना दुष्काळाचा, तर रशियाला विपरित हवामान परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. मागणीतील वाढ आणि कमी पुरवठ्यांमुळे गव्हाच्या किंमतीत गेल्या काही महिन्यात वाढल्या असून कमी मालवाहतूक खर्चामुळेही दक्षिण आशियाई आणि हिंदी महासागर क्षेत्रातील देश हे भारतातून गहू आयातीला पसंती देत असल्याचा दावा करण्यात येतो. भारतीय गव्हाला सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ३१५ डॉलर्स प्रती टन इतका दर मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय गव्हाचे मूल्य आणि मागणी वाढली - दक्षिण आणि पश्‍चिम आशियाई देशात गव्हाच्या निर्यातीत वाढकृषी आणि प्रक्रिया खाद्य निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपीइडीए) आकडेवारीनुसार भारताने १९.८६ लाख टन इतका गहू यावर्षात एप्रिल ते ऑगस्टदरम्यान निर्यात केला आहे. गेल्यावर्षी याच काळात ही गहू निर्यात केवळ २.६३ लाख टन इतकी होती. या आकडेवारीनुसार देशाची गहू निर्यात ७० टक्क्यांनी वाढली आहे. भारत यावर्षी ४५ लाख टन इतका गहू निर्यात करील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषीविभागाने (युएसडीए) आपल्या एका अहवालात व्यक्त केला आहे. युएसडीएनुसार यावर्षी जागतिक पातळीवर उत्पादनाच्या तुलनेत गव्हाची मागणी जास्त आहे. त्यामुळे गव्हाची निर्यात वाढली आहे. गव्हाचे जागतिक उत्पादन किंचितच वाढण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी अमेरिका, कॅनडा, कझाकिस्तान, इराण या देशातील गहू उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील ही दरी भारत, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपिय देश भरून काढत आहेत. त्यांना याचा लाभ मिळत आहे.

गेल्या दोन वर्षात भारतात विक्रमी गहू उत्पादन झाले आहे. २०१९-२० सालात भारतात १० कोटी ७० लाख टन इतके गहू उत्पादन झाले होते. तर २०२०-२१ सालात हेच उत्पादन वाढून १० कोटी ९५ लाख टनावर पोहोचले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भारत सरकारनेही यावर्षी आधारभूत किंमतीवर विक्रमी गहू खरेदी केला आहे. १ ऑक्टोबरपर्यंत ४ कोटी ६८ लाख टन गहू फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एफसीआय) गोदामांमध्ये आहे. हेच गेल्यावर्षी ऑक्टोबरपर्यंत ४ कोटी ३७ लाख टन गहू एफसीआयच्या गोदामांमध्ये होता.

देशात झालेले अतिरिक्त गहू उत्पादन निर्यात होत आहे. कृषी निर्यात क्षेत्रातील कंपन्या शेतकर्‍यांकडून थेट गहू खरेदी करून तो निर्यात करीत आहे. भारत सरकारने गव्हाचे अधारभूत मूल्य यावर्षी १९७५ रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढविले आहे. तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाला २१०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि रशियाने आपल्या गव्हाच्या किंमती वाढविल्या आहेत. यामुळेही भारतीय गव्हाला चांगला दर मिळत असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

भारतीय गव्हाला सध्या ३१५ ते ३१८ डॉलर्स प्रती टन इतका दर मिळत आहे. हेच एप्रिल महिन्यात हा दर २६५ डॉलर्स प्रति टन होता. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ऑस्ट्रोलियाचा गहू ४३३ डॉलर्सचा विकला जात आहे. तर फ्रान्सच्या गव्हाला ३२७ डॉलर्स प्रती टन इतका भाव मिळाला आहे. अमेरिकेच्या गव्हाला ३२२ डॉलर्स, रशिया आणि युक्रेनच्या गव्हाला ३१२.७५ डॉलर्स प्रती टन इतका दर मिळत आहे. दरम्यान, कृषी आणि प्रक्रिया खाद्य निर्यात विकास प्राधिकरणाने(एपीइडीए) गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतातून यावर्षात आतापर्यंत कृषी उत्पादनांची विक्रमी निर्यात झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात १० अब्ज डॉलर्सच्या कृषी उत्पादनाची निर्यात भारताने केली आहे.

२०२०-२१च्या पहिल्या सहा महिन्यात ८.५१ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती. थोडक्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. गहू, मका, मांस, दूध उत्पादनांची निर्यात वाढली आहे. फळे आणि भाज्यांच्या निर्यातीतही आठ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात आर्थिक उलाढालीनंतर परिणाम झालेला असतानाही ही विक्रमी निर्यात झाली आहे.

leave a reply