हेरगिरी करणाऱ्या चिनी महिलेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

- पंतप्रधान कार्यालयातही हेरगिरीचे प्रयत्न

नवी दिल्ली – गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेल्या चिनी महिला हेर ‘किंग शी’च्या चौकशीत धक्कादायक खुलासा झाला आहे. पंतप्रधान कार्यालयापासून ते दलाई लामांपर्यंत चीनचे हेरगिरीचे प्रयत्न सुरु होते. तसेच कोलकातातील एक प्रभावशाली महिला ‘किंग शी’च्या संपर्कात होती आणि काही महत्वाची कागदपत्रे या महिलेने तिला दिल्याचे समोर आले आहे. तपास पथके कोलकाता आणि इतर ठिकाणी ‘किंग शी’च्या संपर्कात असलेल्यांच्या चौकशीसाठी रवाना झाल्याच्याही बातम्या आहेत.

हेरगिरीचे प्रयत्न

सप्टेंबर महिन्यात दिल्ली पोलिसांनी ‘किंग शी’ आणि तिचा नेपाळी साथीदार शेर बहादूर, तसेच एक मुक्त पत्रकार राजीव शर्मा याला अटक केली होती. पत्रकार शर्मा याने आपण गोपनीय माहिती मिळवून ती चिनी हस्तक मिशेल आणि जॉर्जपर्यंत पोहोचवत होतो, असे चौकशीत काबुल केले होते. आता ‘किंग शी’च्या चौकशीत झालेल्या खुलाशांची माहिती माध्यमांमधून समोर येत आहे. चीनने पंतप्रधान कार्यालयासह इतर प्रमुख मंत्रालयातील प्रभावशाली व्यक्तींची, राजनैतिक अधिकाऱ्यांची माहिती आपल्या भारतातील हेरांना मिळविण्यास सांगितली होती. त्यांच्या पद आणि प्रभावानुसार ही माहिती चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याच्या पत्नीपर्यंत पोहोचवण्यात येणार होती.

याशिवाय दलाई लामांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम चीनचे हेर करीत होते. भारतात प्रमुख ठिकाणी आणि विभागात लावण्यात आलेले सुरक्षा उपकरणेही या चिनी हेरांच्या रडारवर होती, अशी माहितीही ‘किंग शी’ ने चौकशी दरम्यान दिल्याचे वृत्त आहे. ‘किंग शी’ चौकशीत काही जणांची नावे समोर आली आहेत. यामध्ये कोलकातातील एका प्रभावशाली महिलेलाही उल्लेख आहे. या महिलेची ओळख करून देणाऱ्याचे नावाचा खुलासाही ‘किंग शी’ने चौकशीत केला आहे. या प्रभावशाली महिलेकडून मिळणारी गोपनीय कागदपत्रेचे चिनी भाषेत भाषांतर करून ते पुढे इतर हस्तकांद्वारे चीनमध्ये पाठविण्यात येत होते.

‘किंग शी’च्या चौकशीत झालेल्या खुलाशाने तपास यंत्रणाही चक्रावल्या असून हाती आलेल्या माहितीच्या आधारे चिनी हेरगिरीसंबंधातील इतर धागेदोरे तपासात आहेत. तसेच ‘किंग शी’बरोबर संपर्कात असलेल्याच्या चौकशीसाठी पथकेही रवाना झाली आहे. किंग शी, शेर बहादूर आणि राजीव शर्मा यांना गेल्या महिन्यात अटक होण्याआधी ऑगस्टमध्ये भारतात चार्ली पेंग उर्फ लिओ सांग या आणखी एका चिनी हेराला अटक झाली होती. चार्ली पेंगच्या चौकशीत त्याने दलाई लामांवर हेरगिरी करीत असल्याचे काबुल केले होते. तसेच तो मनी लॉन्डरिंगमध्येही गुंतला होता. शेल कंपन्यांच्या आडून ‘मनी लॉण्डरिंग’ करणाऱ्या चिनी कंपन्या आणि त्यांच्या भारतीय सहकाऱ्यांच्या ठिकाणावरील आयकर विभागाच्या छाप्यात चार्ली पेंगचे नाव समोर आले होते.

दरम्यान, चिनी हेरगिरीची प्रकारणे अमेरिका,ऑस्ट्रेलियामध्येही समोर आली आहेत. अमेरिकेतील दूतावासांमध्ये माजी चिनी लष्करी अधिकाऱ्याच्या तैनातीचा खुलासा झाल्यानंतर अमेरिकेने हे दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी चीनचे ऑस्ट्रेलियातील हेरगिरीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचा दावा नुकताच केला आहे. चीन आपल्या कंपन्यांद्वारे आणि आयात करण्यात येणाऱ्या उपकरणांद्वारे हेरगिरी करीत असल्याचे आरोप जगभगरातून याआधी झाले आहेत. भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून आतापर्यंत २१८ चिनी ॲपवर बंदी टाकली आहे.

leave a reply