रशियात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या लोकप्रियतेमध्ये लक्षणीय घट

- रशियन संशोधन संस्थेचे सर्वेक्षण

मॉस्को – रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या लोकप्रियतेमध्ये गंभीर नोंद घेण्याएवढी घट झाली आहे. रशियातील तरुणवर्ग पुतिन यांच्या नेतृत्वावर समाधानी नसल्याचे नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. कोरोनाव्हायरसचे संकट आणि अ‍ॅलेक्सी नॅव्हॅल्नीवरील कारवाई यासाठी प्रमुख कारण असल्याचा दावा रशियन संशोधन संस्थेने केला आहे.

‘लेवाडा सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणानुसार, १८-२४ वयोगटातील ४६ टक्के रशियन तरुणवर्ग पुतिन यांच्या कार्यपद्धतीशी सहमत नाही. गेल्या वर्षी याच वयोगटातील असमाधानी तरुणवर्गाची संख्या ३१ टक्के इतकी होती. त्यामुळे तरुणवर्गातील पुतिन यांची लोकप्रियता १५ टक्क्यांनी घसरल्याची माहिती या संस्थेने प्रसिद्ध केली आहे.

कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात रशियन सरकारने स्वीकारलेल्या धोरणांबाबत या तरुणवर्गातील चिडचिड, संताप वाढत गेला आहे. तर पुतिन यांच्या विरोधात आवाज उठविणार्‍या नॅव्हॅल्नी याच्यावर झालेला विषप्रयोग व त्यानंतर झालेली अटक?देखील यासाठी कारणीभूत असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अ‍ॅलेक्सी नॅव्हल्नी यांच्यावर प्राणघातक विषप्रयोग झाला होता. पुतिन यांचे कडवे विरोधक मानल्या जाणार्‍या नॅव्हॅल्नी यांच्यावरील या विषप्रयोगासाठी रशियन सरकार जबाबदार असल्याचा आरोप झाला होता.

काही दिवसांपूर्वी नॅव्हॅल्नी रशियात माघारी आल्यानंतर त्यांना तातडीने अटक करून तुरुंगात धाडण्यात आले होते. यामुळे रशियातील नॅव्हॅल्नी यांचे समर्थक आणि पुतिन यांच्या विरोधकांनी दोन वेळा मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. या निदर्शकांवर रशियन सुरक्षा यंत्रणेने आत्तापर्यंत केलेल्या कारवाईत आठ हजाराहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तरुणवर्गाचा मोठा समावेश आहे. दरम्यान, रशियन सुरक्षा यंत्रणांनी पुतिन विरोधकांवर अधिक कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तर नॅव्हॅल्नी यांनी तुरूंगातून आपल्या समर्थकांना पाठविलेल्या संदेशामध्ये, आपल्या भीतीवर मात करण्याचे आवाहन केले आहे. नॅव्हॅल्नी यांचा हा संदेश पुतिन यांच्या विरोधात मोठ्या निदर्शनांना चिथावणी देणारा असल्याचा दावा केला जातो.

leave a reply