आरबीआयकडून आभासी चलनावर लवकरच निर्णय

नवी दिल्ली – बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी टाकण्यासाठी सरकारने पावले उचलली असतानाच आपल्या देशाची स्वतंत्र डिजीटल करन्सी आणण्यावर काम करण्यात येत आहे. शुक्रवारी आरबीआयकडून याविषयी माहिती देण्यात आली. क्रिप्टोकरन्सीबाबत सरकारला काही चिंता आहेत. त्यामुळे यावर बारकाईने सर्व बाजूंचा विचार केला जात आहे. या डिजिटल चलनाचे मॉड्यूल कसे असेल यावर आरबीआयची समिती काम करीत असून लवकरच याबाबत निर्णय होईल, अशी माहिती आरबीआयचे उपगर्व्हनर बी.पी.कानूनगो यांनी दिली.

गेल्या आठवड्यातच केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बंदी घालण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले होते. यासाठी एक विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे. हे विधेयक संसदेत मंजूर होताच देशात क्रिप्टोकरन्सीवर कायमची बंदी येईल. मात्र सरकार आपले अधिकृत डिजिटल चलनही आणणार आहे. याआधीच आरबीआयने अधिकृत डिजिटल चलन आणण्याची घोषणा केली होती.

या पार्श्‍वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास आणि उपगर्व्हनर बी.पी.कानूनगो यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावेळी उपगव्हर्नर कानूनगो यांनी आरबीआयने काही दिवसांपूर्वीच याबाबत घोषणा केली होती, याची आठवण करून दिली. डिजिटल चलन आणण्याबाबत आरबीआयची एक अंतर्गत समिती काम करीत आहे. ही समितीच या आभासी चलनाच्या मॉड्यूलबाबत निर्णय घेईल. त्यानंतर याबाबत माहिती जाहीर करू, असे कानूनगो म्हणाले.

leave a reply