रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने उलटल्यानंतरही रशियन उत्पादनांची अमेरिकेतील निर्यात सुरुच

मॉस्को/वॉशिंग्टन – रशियावर जबर निर्बंध लादून रशियन अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडून टाकू व युक्रेनविरोधातील युद्ध रोखू, अशा वल्गना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केल्या होत्या. रशियन इंधन, रशियन सोने तसेच चलन व राखीव गंगाजळी यांचा वापर रोखण्यासाठी अमेरिकेने पुढाकारही घेतला होता. मात्र त्याला सहा महिने उलटल्यानंतरही रशियन उत्पादनांची अमेरिकेतील निर्यात व त्यासंदर्भातील व्यवहार अजूनही सुरू असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने तयार केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली.

russia-us-tradeरशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने उलटल्यानंतरही रशियातून लाकूड, धातू, रबर व इतर उत्पादने अमेरिकेत दाखल होत आहेत. गेल्या सहा महिन्यात रशियातून साडेतीन हजारांहून अधिक ‘शिपमेंट्स’ अमेरिकेत दाखल झाल्या आहेत. २०२१ सालच्या तुलनेत यात सुमारे ५० टक्क्यांची घट झाल्याचे सांगण्यात येते. मात्र तरीही रशिया व अमेरिकेदरम्यान दर महिन्याला जवळपास एक अब्ज डॉलर्सचा व्यापार होत असल्याकडे ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेने लक्ष वेधले. यात रशियन लष्कराला संरक्षणसाहित्य पुरविणाऱ्या कंपन्यांचाही समावेश असल्याची जाणीव वृत्तसंस्थेने करून दिली.

रशियातून जवळपास दररोज अमेरिकेच्या बंदरांमध्ये जहाजे दाखल होत आहेत. यात वेटलिफ्टींगसाठी लागणाऱ्या बुटांपासून ते ‘क्रिप्टो मायनिंग’साठी लागणाऱ्या उपकरणांचा समावेश आहे. काही रशियन उत्पादनांच्या बाबतीत अमेरिकेने सौम्य भूमिका घेतली असून त्यात रासायनिक खतांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

अमेरिकेत येणारी काही रशियन उत्पादने निर्बंधांच्या यादीतील असल्याचा दावा वृत्तसंस्थेने केला. मात्र ही उत्पादने रशियाव्यतिरिक्त इतर देशांमधून आल्याचे दाखविण्यात येते. काही उत्पादनांच्या बाबतीत नक्की मूळ देश कोणता हेच स्पष्ट होत नसल्याचेही वृत्तात सांगण्यात आले. निर्बंधांच्या माध्यमातून एखाद्या देशाचा महसूल १०० टक्के रोखता येणे अशक्य असून त्यात फक्त घट करणे शक्य आहे, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येतो. रशिया व अमेरिका हे परस्परांचे मोठे व्यापारी भागीदार नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

leave a reply