एलएसीच्या जवळील क्षेत्रामधील भारत-अमेरिका युद्धसरावावर चीनचा आक्षेप

बीजिंग – भारत आणि अमेरिकेच्या लष्कराने चीनच्या सीमेजवळ आयोजित केलेल्या युद्धसरावामुळे चीन अस्वस्थ झाला आहे. यावर आक्षेप घेऊन चीनने भारताला 1993 आणि 1996 साली केलेल्या सीमाविषयक करारांची आठवण करून दिली. या करारानुसार भारत व चीनच्या सीमावादात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेता येऊ शकत नाही, असे चीनच्या ‘नॅशनल डिफेन्स मिनिस्ट्री’च्या प्रवक्त्याने बजावले. भारताबरोबरील सीमाकराराचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या चीनला यावेळी सदर करारांचा दाखला द्यावा लागत आहे, ही लक्षणीय बाब ठरते.

India-US-excerciseचीनच्या ‘नॅशनल डिफेन्स मिनिस्ट्री’चे प्रवक्ते तान केफेई यांनी भारत व अमेरिकेच्या युद्धसरावावर आक्षेप नोंदविला. 8 ऑगस्ट रोजी हिमाचल प्रदेशमध्ये भारत व अमेरिकेच्या लष्करामध्ये वज्रप्रहार नामक युद्धसराव संपन्न झाला होता. तसेच 14 ते 31 ऑक्टोबर दरम्यान, भारत व अमेरिकेच्या लष्कराचा भव्य युद्धसराव उत्तराखंडच्या अवली येथे पार पडणार आहे. ही बाब गंभीर असल्याचे सांगून केफेई यांनी हा युद्धसराव भारताने चीनबरोबर केलेल्या सीमाविषयक करारांचे उल्लंघन ठरते. अशारितीने सीमावादात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाऊ शकत नाही, असे केफेई पुढे म्हणाले.

पुढच्या काळात दोन्ही देशांमध्ये झालेल्या सीमाविषयक कराराचे भारत काटेकोरपणे पालन करील, अशी अपेक्षा केफेई यांनी व्यक्त केली. अन्यथा याचे परिणाम संभवतात, असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. मात्र भारत सध्या तरी चीनच्या इशाऱ्यांची पर्वा करण्याच्या स्थितीत नाही. भारताने लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चीनने या क्षेत्रातील एलएसीवर तैनात केलेले लष्कर मागे घ्यावे, अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यास चीन तयार नाही. चीनच्या या हेकेखोरपणामुळे एलएसीवरील तणाव कमी झालेला नाही. त्याचवेळी चीन भारताबरोबर केलेल्या करारांचा आदर न करता त्याचे उल्लंघन करीत आहे. दोन्ही देशांमधील सीमावादाचे हे मूळ ठरते, याची जाणीव भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली होती.

अशा परिस्थितीत भारताने अमेरिकेबरोबर लष्करी सरावाचे आयोजन करून चीनला आणखी एक धक्का दिला आहे. दुर्गम व पहाडी क्षेत्रातील युद्धात भारतीय सैन्याचे कौशल्य वादातीत आहे. म्हणूनच जगभरातील देश भारतीय सैन्याच्या या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी संयुक्त युद्धसराव करण्यासाठी उत्सुक असतात. महासत्ता असलेली अमेरिका देखील याला अपवाद नसल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत भारत व अमेरिकन लष्कराचा आपल्या सीमेजवळील क्षेत्रातील युद्धसराव चीनला कमालीचा अस्वस्थ करणारा ठरत आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये लष्करी सरावाची व्याप्ती वाढत असून पुढच्या काळातही चीनला भारत-अमेरिकेच्या अशा युद्धसरावांची तयारी ठेवावी लागेल.

याआधी चीनच्या पाकिस्तानबरोबरील सहकार्यावर भारताने वेळोवेळी नोंदविलेल्या आक्षेपांकडे चीनने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या भूभागात चीनचे लष्कर तैनात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. भारताच्या सुरक्षेला वारंवार आव्हान देणारा चीन आता मात्र भारताला सीमाविषयक सहकार्य करारांची आठवण करून देत असल्याचे दिसत आहे.

leave a reply