स्लोव्हेनियाकडून तैवानबरोबरील सहकार्य वाढविण्याचे संकेत

स्लोव्हेनिया/बीजिंग – लिथुआनियापाठोपाठ मध्य युरोपमधील स्लोव्हेनियाने तैवानबरोबरील राजनैतिक व व्यापारी सहकार्य वाढविण्याचे संकेत दिले आहेत. स्लोव्हेनियाच्या पंतप्रधानांनी भारताच्या सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात वक्तव्य केले. यावेळी त्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सत्तेचा समतोल कायम राखण्यासाठी तसेच तणाव कमी करण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही अधोरेखित केले.

स्लोव्हेनियाकडून तैवानबरोबरील सहकार्य वाढविण्याचे संकेतगेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लिथुआनियात तैवानने आपले राजनैतिक कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर चीनने आक्रमक धोरण स्वीकारत लिथुआनियाच्या मुद्यावरून इतर युरोपिय देशांवर दडपण आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र चीनच्या या दडपणाकडे दुर्लक्ष करीत स्लोव्हेनिया या दुसर्‍या युरोपिय देशानेही तैवानबरोबरील सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य व लोकशाहीवादी मूल्यांसाठी स्लोव्हेनिया नेहमीच तैवानच्या पाठीशी उभा राहिल, अशी ग्वाही स्लोव्हेनियाचे पंतप्रधान जानेझ जान्सा यांनी दिली.

दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत जान्सा यांनी तैवानमध्ये स्लोव्हेनिया आपले राजनैतिक कार्यालय सुरू करेल, असे संकेतही दिले. त्याचवेळी पंतप्रधान जान्सा यांनी, भारत हा स्लोव्हेनियासह पूर्ण युरोपसाठी महत्त्वाचा व धोरणात्मक भागीदार असल्याचे स्पष्ट केले. भारताचे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थान व भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

दरम्यान, स्लोव्हेनियाच्या पंतप्रधानांनी तैवानसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. चीनच्या प्रवक्त्यांनी स्लोव्हनियाच्या पंतप्रधानांचे वक्तव्य धक्कादायक असल्याचे सांगून सदर वक्तव्य तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थन करणारे असल्याचे टीकास्त्र सोडले.

leave a reply