रशियावरील निर्बंधांनंतर काही देश अमेरिकी डॉलरचा वापर कमी करु शकतात

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

वॉशिंग्टन – अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देशांनी रशियाच्या परकीय गंगाजळीतील ३०० अब्ज डॉलर्सचा निधी गोठविला आहे. पाश्‍चिमात्य देशांच्या या कारवाईनंतर जगातील काही आघाडीचे देश आपल्या परकीय गंगाजळीतील अमेरिकी डॉलरच्या हिश्श्याबाबत फेरविचार करु शकतात, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बजावले आहे. अमेरिकेतील आघाडीच्या अभ्यासगटानेही या मुद्याकडे लक्ष वेधले असून अमेरिकेकडून निर्बंधांचा होणारा वापर अनेक देशांना डॉलरपासून दूर नेऊ शकतो, असा इशारा दिला आहे. गेल्या वर्षीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, डॉलरचे राखीव चलन म्हणून असलेले महत्त्व अमेरिकाच संपवून टाकत आहे, असा दावा केला होता.

युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व मित्रदेशांनी रशियावर जबर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांनुसार रशियाला ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहार यंत्रणेचा वापर करण्यापासून रोखण्यात आले आहे. त्याचवेळी अमेरिकेसह विविध देशांमध्ये असलेल्या रशियाच्या परकीय गंगाजळीचा मोठा हिस्सा वापरण्यापासून मनाई करण्यात आली आहे. पाश्‍चिमात्य देशांच्या या कारवाईमुळे रशियाची मध्यवर्ती बँक रशियन गंगाजळीचा भाग असलेला ३०० अब्ज डॉलर्सचा निधी वापरू शकत नाही.

या निर्बंधांना पर्याय म्हणून रशियाने इतर देशांना रुबल, युआनसह संबंधित देशांच्या स्थानिक चलनांचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशियाशी मोठ्या प्रमाणात व्यापारी व आर्थिक व्यवहार करणार्‍या चीन, भारत यासारख्या देशांनी हा प्रस्ताव स्वीकारून व्यवहार सुरू केल्याचेही समोर आले आहे. दुसर्‍या बाजूला सौदी अरेबियासारख्या आघाडीच्या इंधन उत्पादक देशाने इंधन व्यवहारांसाठी अमेरिकन डॉलरच्या ऐवजी चीनच्या युआनचा वापर करण्याचे संकेत दिले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या जागतिक वित्तसंस्थेकडून करण्यात आलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. नाणेनिधीच्या उपप्रमुख गीता गोपीनाथ यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत डॉलरबाबत हा सावधानतेचा इशारा दिला. ‘सध्याच्या स्थितीत आंतरराष्ट्रीय व्यवहारांशी निगडित व्यवस्थेत मोठ्या उलथापालथी होत आहेत. काही देश आपल्या परकीय गंगाजळीत विशिष्ट चलनाचा हिस्सा कमी करण्याबाबत विचार करीत आहेत. जागतिक राखीव चलन म्हणून असलेले स्थान अमेरिकी डॉलर लगेचच गमावणार नाही. मात्र युक्रेनमधील युद्ध लांबल्यास त्याचे परिणाम अमेरिकी डॉलरवर दिसून येऊ शकतात’, असे गोपीनाथ यांनी बजावले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपूर्वी अमेरिकेतील एका अभ्यासगटानेही डॉलरच्या स्थानाबाबत शंका व्यक्त करणारा इशारा दिला आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर द ऍनालिसिस ऑफ ग्लोबल सिक्युरिटी’ या अभ्यासगटाने अमेरिकेकडून सुरू असलेल्या निर्बंधांच्या मार्‍याकडे लक्ष वेधले. ‘निर्बंध व इतर आर्थिक कारवाईचा विचार करताना अमेरिका डॉलरचा वापर बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे बेसुमार प्रमाणात करीत आहे. त्यामुळे काही आघाडीच्या मध्यवर्ती बँका अमेरिकी डॉलरवर अवलंबून राहणे योग्य आहे का यावर गांभीर्याने विचार करू लागल्या आहेत’, असे ‘इन्स्टिट्यूट फॉर द ऍनालिसिस ऑफ ग्लोबल सिक्युरिटी’चे सहसंचालक गाल लुफ्त यांनी म्हटले आहे.

leave a reply