दक्षिण कोरियाने स्वदेशी बनावटीची ‘अँटी मिसाईल सिस्टिम’ विकसित केली

‘अँटी मिसाईल सिस्टिम’सेऊल – दक्षिण कोरियाने स्वदेशी बनावटीची ‘अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टिम’ विकसित केल्याची माहिती ‘योनहाप’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिली. काही दिवसांपूर्वीच या क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी यशस्वी झाल्याचे वृत्त सरकारी तसेच लष्करी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आले आहे. दक्षिण कोरियात सध्या अमेरिकी बनावटीच्या ‘पॅट्रियॉट’ व ‘थाड’ या दोन क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात आहेत. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी लक्ष वेधून घेत आहे.

‘लाँग रेंज सरफेस टू एअर इंटरसेप्टर’ (एल-सॅम) असे या यंत्रणेचे नाव आहे. दक्षिण कोरियाने फेब्रुवारी महिन्यात या यंत्रणेच्या पहिल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. त्यानंतर नऊ महिन्यात स्वदेशी बनावटीच्या यंत्रणेची चाचणी घेऊन दक्षिण कोरियाने आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

उत्तर कोरियाच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने ‘लेअर्ड डिफेन्स नेटवर्क’ची उभारणी सुरू केली आहे. सध्या यात अमेरिकेच्या पॅट्रिऑट क्षेपणास्त्रांसह कोरियन बनावटीच्या ‘चेओन्गुंग २केएम-सॅम’ क्षेपणास्त्र यंत्रणेचा समावेश आहे. नवी ‘एल-सॅम सिस्टिम’ क्षेपणास्त्रांबरोबरच लढाऊ विमानांनादेखील लक्ष्य करु शकते, अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली.

दक्षिण कोरिया सध्या मोठ्या प्रमाणावर अमेरिकी बनावटीच्या क्षेपणास्त्र व शस्त्रास्त्र यंत्रणांवर अवलंबून आहे. नवे राष्ट्राध्यक्ष यू सुक-योल यांनी संरक्षणसिद्धतेवर अधिकाधिक भर देण्याचे धोरण स्वीकारले असून त्यात अमेरिकी यंत्रणांबरोबरच स्वदेशी बनावटीची शस्त्रे विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. नव्या क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी त्याचाच भाग ठरतो.

leave a reply