‘जपानकडून ‘एसएम-३’ इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी

‘एसएम-३’टोकिओ – उत्तर कोरियाकडून सुरू असलेल्या आक्रमक क्षेपणास्त्र चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर जपानच्या नौदलाने नुकतीच ‘एसएम-३’ बॅलिस्टिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. गेल्या आठवड्यात हवाई बेटांजवळ चाचणी पार पडल्याची माहिती जपानी नौदलाने दिली. अमेरिकेच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या चाचण्यांमध्ये ‘जेएस माया’ व ‘जेएस हगुरो’ या जपानी विनाशिका सहभागी झाल्या होत्या. जपानी युद्धनौकांवरून ‘एसएम-३’ बॅलिस्टिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ ठरते.

गेल्या काही महिन्यात उत्तर कोरियाकडून सातत्याने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राचीही चाचणी केली होती. यामुळे पॅसिफिक क्षेत्रातील तणाव वाढल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जपानने इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी करणे महत्त्वाचे ठरते. जपानी युद्धनौकांनी ‘एसएम-३’ बॅलिस्टिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राच्या ‘ब्लॉक २ए’ व ‘ब्लॉक १बी’ या दोन वेगवेगळ्या व्हेरिअंट्सच्या चाचण्या केल्याचे नौदलाने जाहीर केले. यातील ‘ब्लॉक २ए’ क्षेपणास्त्र जपान व अमेरिकेने संयुक्तरित्या विकसित केले आहे.

चीन तसेच उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी जपान प्रगत क्षेपणास्त्रांसह ‘मिसाईल डिफेन्स’ यंत्रणांवर भर देत असून ‘एसएम-३’ची चाचणी ‘बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स’साठी महत्त्वाचा टप्पा ठरतो.

leave a reply