दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युएई, सौदी, इजिप्तच्या भेटीवर

युएईला अब्जावधी डॉलर्सच्या क्षेपणास्त्रांची विक्री; सौदी अरेबियाबरोबर १३ धोरणात्मक करार

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षरियाध/सेऊल – ‘येमेनमधील हौथी बंडखोरांनी युएईची राजधानी अबू धाबीवर चढविलेल्या ड्रोन हल्ल्यांचे अजिबात समर्थन करता येणार नाही. ड्रोन हल्ले तसेच रेड सीच्या सागरी क्षेत्रात युएईच्या जहाजाचे झालेले अपहरण, यासारख्या घटना आखातातील शांती व स्थैर्यासाठी धोकादायक आहेत’, अशा शब्दात दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी हौथी बंडखोरांच्या हल्ल्याचा निषेध केला. युएईच्या दौर्‍यावर असताना दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच युएईला साडेतीन अब्ज डॉलर्सच्या क्षेपणास्त्रांची विक्री करणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी घोषित केले.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन हे आखाती देशांच्या दौर्‍यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी युएईच्या दुबईपासून आपल्या या दौर्‍याची सुरुवात केली. ‘दक्षिण कोरिया आणि युएईमधील गेल्या ४१ वर्षांपासूनचे संबंध अधिक वेगाने विकसित होत आहेत. युएई हा दक्षिण कोरियासाठी आखातातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. यापुढे दक्षिण कोरियाला युएईसोबत सर्वसमावेशक धोरणात्मक आर्थिक सहकार्य प्रस्थापित करायचे आहे’, असे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षसोमवारी येमेनच्या हौथी बंडखोरांनी युएईची राजधानी अबू धाबीवर हल्ले चढविले, तेव्हा दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष दुबईमध्ये होते. युएईच्या राजधानीला लक्ष्य करणार्‍या या हल्ल्यांचा राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी कठोर शब्दात निषेध केला. त्याचबरोबर आठवड्यापूर्वी हौथींनी रेड सीच्या सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्‍या व्यापारी जहाजावर केलेल्या कारवाईवरही दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी टीका केली. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याबरोबर झालेल्या भेटीत राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांवर चर्चा केली. तसेच हौथींच्या ताब्यात असलेले जहाज व कर्मचार्‍यांची सुरक्षित सुटका होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या आपल्या आखाती दौर्‍यात दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युएई तसेच सौदीबरोबर महत्त्वाचे करार केले. दक्षिण कोरियाने युएईला साडेतीन अब्ज डॉलर्सचे जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे अर्थात इंटरसेप्टरच्या विक्रीसंबंधी करार केला. ४० किलोमीटर उंचीवरील क्षेपणास्त्रे भेदू शकणार्‍या या इंटरसेप्टर्सच्या खरेदीबाबत युएई व दक्षिण कोरियामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच चर्चा झाली होती. हौथी बंडखोरांचे युएईवरील वाढते हल्ले लक्षात घेता, दोन्ही देशांमधील या संरक्षणविषयक सहकार्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षयुएईनंतर सौदीला भेट देणार्‍या दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदीसोबत १३ धोरणात्मक करार केले आहे. यामध्ये ऊर्जा, उत्पादन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि डिजिटलायझेशन, आरोग्य व्यवस्था या क्षेत्रातील करारांचा समावेश आहे. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याबरोबर ‘हायड्रोजन इकोनॉमी’वरही चर्चा केली. यानंतर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष इजिप्तच्या दौर्‍यावर जाणार आहेत.

युएईने दक्षिण कोरियाकडून खरेदी केलेली हवाई सुरक्षा यंत्रणा अतिप्रगत मानली जाते. दक्षिण कोरियाकडे अमेरिकन बनावटीची थाड आणि पॅट्रियॉट या हवाई सुरक्षा यंत्रणा आहेत. तरी देखील इस्रायलच्या ‘आयर्न डोम’सारख्या स्वत:च्या हवाई सुरक्षा यंत्रणे निर्मितीासाठी दक्षिण कोरिया प्रयत्न करीत आहे. तर दोन दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाने क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करणार्‍या लेझरची चाचणी केली.

leave a reply