अफगाणी जनतेच्या तीव्र निदर्शनांमुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा अफगाणिस्तानचा दौरा रद्द

तीव्र निदर्शनांमुळेइस्लामाबाद – पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांना मंगळवारचा अफगाणिस्तान दौरा रद्द करावा लागला. अफगाणिस्तानातील खराब हवामामुळे ही भेट पुढे ढकलावी लागल्याचे पाकिस्तानी यंत्रणांचे म्हणणे आहे. पण अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पाकिस्तानच्या विरोधात सुरू असलेल्या तीव्र निदर्शनांमुळे युसूफ यांना दौरा रद्द करावा लागल्याचे दिसत आहे.

गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या सरकारी यंत्रणांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांच्या दोन दिवसांच्या अफगाणिस्तानच्या दौर्‍याची घोषणा केली होती. अफगाणिस्तानातील मानवतावादी संकटावर चर्चा करण्यासाठी मोईद युसूफ तालिबानच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे पाकिस्तानच्या यंत्रणांनी म्हटले होते. पण गेल्या महिन्याभरापासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील ड्युरंड लाईनवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर युसूफ यांचा हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे होते.

तीव्र निदर्शनांमुळेमोईद युसूफ मंगळवारी काबुलमध्ये दाखल होणार होते. पण त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती पाकिस्तानी सरकारच्या सूत्रांनी दिली. अफगाणिस्तानातील खराब हवामानामुळे युसूफ यांना ऐनवेळी दौरा रद्द करावा लागल्याचे जाहीर करण्यात आले. पण अफगाणिस्तानातील माध्यमांनी याबाबत वेगळीच माहिती प्रसिद्ध केली.

मंगळवार सकाळपासून राजधानी काबुलमध्ये पाकिस्तानविरोधी निदर्शने होती. यामध्ये शेकडो अफगाणींनी सहभाग घेतला होता. युसूफ काबुलमध्ये दाखल झाल्यानंतर या निदर्शनांची तीव्रता वाढली असती, याची खबर लागल्यामुळे पाकिस्तानने युसूफ यांचा दौरा रद्द केल्याचे अफगाणी माध्यमांनी म्हटले आहे.

तर युसूफ यांचा दौरा रद्द झाल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने दिलेल्या कारणाची पाकिस्तानच्याच पत्रकारांनी खिल्ली उडविली. अफगाणिस्तानातील खराब हवामानामुळे म्हणजे पाकिस्तानसाठी राजकीयदृष्ट्या पोषक नसलेले हवामान ठरते का? त्यामुळे हा दौरा रद्द करावा लागला का? असे प्रश्‍न काही पत्रकारांनी विचारले. ड्युरंड लाईनच्या वादामुळे तर तालिबाननेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा दौरा रद्द तर करून टाकला नाही ना, अशी शंकाही अन्य काही पत्रकारांनी उपस्थित केली.

पाकिस्तानच्या काही पत्रकारांनी ‘आयएसआय’चे तत्कालिन प्रमुख फईझ हमीद यांच्या अफगाणिस्तान भेटीनंतरच्या घडामोडींकडे लक्ष वेधले. मोईद युसूफ लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांना टाळून अफगाणिस्तानला जाणार होते, याकडेही पाकिस्तानचे पत्रकार लक्ष वेधत आहेत.

leave a reply