तेहरिक-ए-तालिबानबरोबरच्या संघर्षबंदीमुळे पाकिस्तानातील आघाडी सरकारमध्ये फूट

talibansइस्लामाबाद – अफगाणिस्तानजवळच्या सीमेवरील संघर्ष संपविण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेबरोबर संघर्षबंदी लागू केली. पण पाकिस्तानातील दहशतवादी हल्ले रोखण्यात ही संघर्षबंदी अपयशी ठरली. काही तासांपूर्वीच खैबर-पख्तूनख्वा येथे पाकिस्तानी पोलिसांवर झालेल्या गोळीबारात दोघांचा बळी गेला. तर या संघर्षबंदीचे हादरे पाकिस्तानातील आघाडी सरकारला बसत आहेत. शाहबाझ शरीफ यांच्या सरकारमध्येच तेहरिकबरोबरच्या संघर्षबंदीवरुन खटके उडत आहेत.

गेल्या महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी ‘आयएसआय’चे माजी प्रमुख फैझ हमीद यांना तेहरिक-ए-तालिबानच्या नेत्यांबरोबर संघर्षबंदीसाठी रवाना केले होते. तेहरिकने पाकिस्तान सरकारची मागणी मान्य करून संघर्षबंदी लागू केली. पण यासाठी तेहरिकच्या नेत्यांनी पाकिस्तान सरकारसमोर आपल्या मागण्या प्रस्तावित केल्या होत्या. यावर पाकिस्तान सरकारने घोषणा करण्याचे टाळले आहे.

pak-soldiersपण तेहरिकबरोबर संघर्षबंदी लागू केल्यानंतरही अफगाण सीमेजवळील भागातील हिंसाचार आणि जवानांवरील हल्ले थांबलेले नाहीत, याकडे पाकिस्तानची माध्यमे लक्ष वेधत आहेत. संघर्षबंदीच्या आधी मे महिन्यात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 66 जणांचा बळी गेला होता. पण संघर्षबंदी लागू झाली त्या जून महिन्यातच 102 जण दहशतवादी हल्ल्यांमध्ये ठार झाले. या हल्ल्यांमध्ये सुरक्षा जवानांच्या बळींच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाल्याचे पाकिस्तानी यंत्रणेचेच म्हणणे आहे.

त्यातच तेहरिकने पाकिस्तानच्या सरकारला आपल्या मागण्यांची आठवण करून दिली. तसेच पाकिस्तान सरकारबरोबरची संघर्षबंदी यशस्वी ठरली तरी आपल्या मागण्यांपासून माघार घेणार नाही, असे तेहरिकच्या नेत्याने स्पष्ट केले आहे. खैबर पख्तूनख्वा आणि ‘फेडरली ॲडमिनिस्ट्रेड ट्रायबल एरियाज्‌‍-फाटा’ या प्रांताचे विलगीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याचे तेहरिकच्या नेत्याने जाहीर केले होते. पाकिस्तानचे सरकार तेहरिकची ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. कारण असे झाले तर फाटा, वझिरिस्तान या प्रांतावर पाकिस्तानला पाणी सोडावे लागेल. तसेच येत्या काळात तेहरिक पाकिस्तानच्या इतर भागावरही दावा सांगू शकते, अशी चिंता पाकिस्तानच्या सरकारला सतावित आहे. याच मुद्यावरुन ‘पाकिस्तान पिपल्स पार्टी’ या सत्ताधारी सरकारमधील राजकीय पक्षाने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तेहरिकसोबत केलेल्या संघर्षबंदीवर टीका केली आहे.

अशा परिस्थितीत, पाकिस्तान सरकारने तेहरिकबरोबरची संघर्षबंदी मोडली तर पाकिस्तानातील हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढेल, याची चिंता पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करीतआहेत.

leave a reply