येमेनमधील हौथींचा संघर्षबंदी वाढविण्यास नकार

yemen-houthiएडन – येमेनमधील हौथी बंडखोरांनी गेल्या 48 तासात वेगवेगळ्या भागात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये येमेनी लष्कराच्या नऊ जवानांचा बळी गेला. हौथींचे हे हल्ले म्हणजे संघर्षबंदीचे उल्लंघन असल्याचा आरोप येमेनचे लष्कर करीत आहे. तर हौथी बंडखोरांनी देखील गेल्या चार महिन्यांपासून येमेनमध्ये लागू केलेली संघर्षबंदी वाढविण्यास तयार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे येत्या काळात येमेनमध्ये नव्याने संघर्ष भडकणार असल्याचे दिसत आहे.

गेल्या सात वर्षांपासून येमेनमध्ये सौदी अरेबिया व अरब देशांचे समर्थन असलेले राष्ट्राध्यक्ष हादी यांचे सरकार आणि इराणसमर्थक हौथी बंडखोरांमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षात लाखो जणांचा बळी गेला तर 40 लाखाहून अधिक जण विस्थापित झाले आहेत. चार महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करून येमेनचे सरकार आणि हौथी बंडखोरांमध्ये संघर्षबंदी लागू केली होती.

गेल्या आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या संघर्षबंदीचे स्वागत करून याचा कालावधी वाढविण्याचे आवाहन केले होते. सौदीने देखील यासाठी सहमती व्यक्त केली होती. पण येमेनचे सरकार तसेच सौदी व अरब देशांबरोबरची संघर्षबंदी वाढविणार नसल्याचे हौथी बंडखोरांनी जाहीर केले. यामुळे गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेले येमेनचे गृहयुद्ध यापुढेही पेटत राहणार आहे.

leave a reply