रुपया स्थिर करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत

-‘आरबीआय'चे गव्हर्नर शक्तीकांत दास

नवी दिल्ली – चार दिवसांपूर्वी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाली होती. पण हळुहळू रुपया सावरत असल्याचे गेल्या दोन दिवसांमधील घडामोडीतून स्पष्ट होत आहे. तरी देखील रुपयाची ही घसरण चिंतेची बाब असल्याचे इशारे दिले जात आहेत. केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या मंत्र्यांनी याबाबत जनतेला ग्वाही दिली होती. तर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुढे येऊन देशातील गुंतवणूकदार, व्यावसायिकांना आश्वस्त केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला हादरे बसत असले तरी भारतीय अर्थव्यवस्था कितीतरी पट सुस्थितीत आहे. तसेच रुपया मजबूत करण्यासाठी ‘आरबीआय’कडून योग्य ती पावले उचलली जातील. यात कुठलीही हयगय केली जाणार नाही, अशी घोषणा आरबीआयच्या प्रमुखांनी केली.

stabilise-rupeeयुक्रेनचे युद्ध आणि कोरोनाचे संकट यामुळे जगभरातील अर्थव्यवस्था बाधित झाल्या आहेत. विकसित देशांच्या चलनाची देखील विक्रमी स्तरावर घसरण होत आहे. युरोपिय देशांचे ‘युरो’ चलन देखील अमेरिकन डॉलरच्या खाली घसरले आहे. युरोप्रमाणे ब्रिटिश पौंड व जपानचा येन यांचे मूल्य देखील घसरत असून चीनमध्ये ‘मॉर्गेज क्रायसिस’ तयार होत असल्याचे इशारे दिले जात आहेत. 2008 साली अमेरिकेत आलेल्या आर्थिक संकटाची पुनरावृत्ती चीनमधून होईल व याचा परिणाम जगभरात होईल, असे अमेरिकेच्या वृत्तसंस्था बजावत आहेत.

जगभरात या साऱ्या नकारात्मक घडामोडी सुरू असल्या तरी त्याचा तितकासा परिणाम भारताच्या आर्थिक स्थितीवर झालेला नाही, असा विश्वास आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला. विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचा दावा दास यांनी केला.

दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी केल्याने अमेरिकेचा डॉलर भक्कम झाला. त्यामुळे इतर देशांच्या चलनाचे दर भक्कम झालेल्या डॉलरच्या तुलनेत घसरले. भारताच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिवांनी चार दिवसांपूर्वीच ही बाब लक्षात आणून दिली होती.

leave a reply